वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेला फटका
वसई: गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने रविवारी वसई-विरारमधील बाजारात खरेदीचा उत्साह होता. खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारात गर्दी होती. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही बसला.
गणेशोत्सवापूर्वीचा अखेरचा रविवार असल्याने मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे रस्त्यावरही वाहनांची मोठी वर्दळ होती. त्यामुळे नालासोपारा पूर्व, पश्चिम, आचोळे रोड, वसई स्टेशन जवळील परिसर, अंबाडी रोड, गोखीवरे सातीवली रस्ता, माणिकपूर नाका, विरार पूर्व पश्चिम, मनवेल पाडा रस्ता यासह ठिकठिकाणच्या भागातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांची करोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत वस्तू खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यामुळे येथील ये-जा करण्याच्या मार्गातही अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या रस्त्यातून वाट काढणे वाहनचालकांना कठीण होऊ बसले. विशेष करून दुपारनंतर शहरात खरेदीसाठी नागरिकांचा ओघ वाढला होता. यामुळे शहरातील रस्तेही भरगच्च भरून गेले होते. यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.
या होणाऱ्या गर्दीवर व वाहतूक कोंडीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ही समस्या अधिकच जटिल बनली होती. विरारच्या स्थानकांच्या जवळील परिसरात आधीच मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मात्र खरेदीच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडले होते त्यामुळे या ठिकाणच्या उड्डाणपुलावर ही वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे यातच रुग्णांना घेऊन दोन रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या. काही
वाहनचालक बेशिस्तपणे वाहने मध्येच टाकत असल्याने ही कोंडी झाली होती. यामुळे बराच वेळ या दोन्ही रुग्णवाहिकांना अडकून राहावे लागले. काही वेळाने त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यात आली. तसेच एकीकडे शहरातील करोनाची दुसरी लाट ओसरत असताना नियम पायदळी तुडवत अशा प्रचंड झालेल्या गर्दीमुळे शहरात करोनाची तिसरी लाट उफाळून येण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.