भाईंदर: उद्घाटनाच्या तीन वर्षानंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या नव्या रुग्णालयाच्या बांधकामास अखेर सुरुवात झाली आहे. यात रुग्णालय उभारणीच्या धोरणात बदल करण्यात आला असून येत्या तीन वर्षात हे रुग्णालय सुरु करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.
मिरा भाईंदर शहरात सर्व वैद्यकीय सोयी सुविधांनी सज्ज असलेले ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालय’ उभारण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटीच्या निधीसह जून २०२२ मध्ये मंजुरी दिली होती. त्यामुळे महापालिकेच्या विकास आराखड्यात रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर ( आरक्षण क्रमांक -३०२) ५०० खाटा असलेले रुग्णालय विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता असल्यामुळे हे काम विकासकामार्फत करण्याचे ठरले होते. त्यानुसार विकासकाला विकास हक्क प्रमाणपत्र ( कन्स्ट्रक्शन टीडीआर ) देऊन या इमारतीची निर्मिती केली जाणार होती. याबाबत महापालिकेने एका मोठ्या बांधकाम संस्थेशी करार केला होता. त्यानंतर १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
मात्र भूमिपूजनानंतर मागील तीन वर्षांपासून हे काम ठप्प होते. दरम्यान रुग्णालय उभारणीच्या कामात धोरणात्मक बदल करून हे काम नुकताच सुरु केल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली. त्यानुसार येत्या तीन वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असून त्यानंतर वैद्यकीय साहित्य व इतर आधुनिक उपकरणे देखील शासन निधीतून उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.
असे असणार रुग्णालय
मिरा रोड येथील हाटकेश भागात या रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. तळमजला अधिक चौदा मजल्याचे हे रुग्णालय असणार आहे. यामध्ये एकूण ३७७ खाटा असणार असून त्यामध्ये ३०० सामान्य, ५० अति दक्षता विभाग आणि अन्य आपत्कालीन विभागात असणार आहे.
माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्साचे नाव देण्याची मागणी
मिरा भाईंदर शहराचे पहिले नगराध्यक्ष व माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ विविध वास्तूंना त्याचे नाव देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दरम्यान आता महापालिका क्षेत्रात नव्याने उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला त्याचे नाव देण्याची मागणी मेंडोन्सा समर्थक करत आहे. मेंडोन्सा यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक गोरगरिबांची सेवा केली. त्यामुळे रुग्णालयाला त्यांचे नाव दिल्यास ही सेवा सार्थक ठरेल,अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.