वसई : १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दानिश खान याला गुन्हे शाखेच्या २ च्या पथकाने नालासोपारा येथून अटक केली. मात्र सोमवारी आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. अर्ध्या तासाच्या नाट्यमय शोधानंतर वसईतील एका वाडीत ड्रममध्ये लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
शुक्रवारी नालासोपारा पूर्वेच्या धुमाळ नगर परिसरात १२ वर्षांच्या मुलीवर एका अज्ञात इसमाने लैंगिक अत्याचार केला होता. त्याने पीडित मुलीला फूस लावून निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ही मुलगी मूळ उत्तरप्रदेशातील असून संतोष भुवन परिसरात राहते. मुलीवर अत्यंत निर्दयी पध्दतीने अत्याचार कऱण्यात आल्याने तिची प्रकृती ढासळली होती. हे प्रकरण संवेदनशील आणि गंभीर असल्याने गुन्हे शाखा-२ चे पथक या प्रकरणाचा तपास करत होते.
आरोपीला नालासोपार्यातून अटक दरम्यान गुन्हे शाखा-२ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा घडल्याच्या ४८ तासाांच्या आत पोलिसांनी आरोपीला नालासोपारा येथून अटक केली. दानिश जमी खान उर्फ जमीर (२३) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांनी दिली.
आरोपीचे पलायन नाट्य
दरम्यान, आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सोमवारी दुपारी ३ वाजता आरोपीला दानिश खान याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले होते. तो प्रसानधनगृहात जाण्याचा बहाणा करून पोलिसांना चकमा देऊन पसार झाला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. त्याचा शोध सुरू करण्यात आला. वसई पंचायत समिती येथील एका वाडीत तो गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांचे पथके या वाडीत शिरली. तेथील एका निर्जन घरात असलेल्या पाण्याच्या पिंपात (ड्रम) मध्ये तो लपला होता. पोलिसांनी त्याला ड्रम मधून बाहेर काढून पकडले. अर्धा तास हे नाट्य सुरू होते.
