कल्पेश भोईर
वसई: आधीच करोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या समोर आता पूरस्थितीचे संकट ओढवले आहे. नुकताच झालेल्या पूरस्थितीमुळे वसईतील अनेक कारखान्यात पाणी जाऊन यंत्रसामग्री, कच्चा माल, तयार करण्यात आलेला माल व इतर साहित्य पूर्णत: पाण्यात गेल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसईच्या भागात नवघर, वालीव, सातीवली ,रेंज ऑफिस, गोलानी यासह इतर विविध ठिकाणच्या भागात औद्योगिक वसाहती आहेत. यात अडीच ते तीन हजाराहून अधिक लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग कारखाने आहेत. मागील काही महिन्यांपासून करोनाच्या संकटातून सावरत आपले उद्योग पूर्वपदावर येऊ लागले आहेत असे असतानाच शहरात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात घुसल्याने कारखान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

वालीव यासह रेंज ऑफिस आदी ठिकाणचे कारखान्यात जवळपास चार ते पाच फूट पाणी इतके पाणी शिरले होते. याआधी कधीच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी साचले नव्हते प्रथमच या ठिकाणच्या भागात अचानकपणे इतके पाणी साचले असल्याचे कारखानदारांनी सांगितले आहे. पुराच्या पाण्यात कारखान्यात असलेल्या सुरू असलेल्या यंत्रणाही बंद पडल्या आहेत. तर कच्चा मालदेखील भिजला आहे. माल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महागडय़ा यंत्रसामग्री या पाण्यात भिजून नादुरुस्त झाल्या आहेत.  त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने ठप्प झाली. या पाण्याचा फटका मोठय़ा प्रमाणात लहान उद्योजकांना बसला आहे. वसईतील रेंज ऑफिसजवळ शीतल इंडस्ट्री आहे यात विविध कारखानदारांचे ११ गाळे आहेत. या  सर्व गाळ्यात पाच ते सहा फूट इतके पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. माझेच कमी कमी ८ ते १० लाखांचे नुकसान झाले असल्याचे उद्योजक दत्ता भाने यांनी सांगितले आहे. तर शेजारी असलेल्या गाळ्यात असलेल्या कोटय़वधी रुपये किंमतीच्या सीएनसी मशीनसुद्धा पाण्यात गेल्या असल्याचे भाने यांनी सांगितले तर रोनल रॉड्रिक्स यांच्या प्लास्टिक मोल्डिंगच्या कारखान्यात पाणी जाऊन आठ मशीन व इतर कच्चा माल भिजून जवळपास एक कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चौकट

अचानक इतके पाणी आले कुठून?

मागील काही वर्षांंपासून वसई विरार शहर पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण होत असते मात्र कधी वसईतील काही औद्योगिक क्षेत्रातील भागात इतके पाणी भरत नाही. शनिवारी रात्री झालेल्या अवघ्या काही तासाच्या पावसात संपूर्ण औद्योगिक क्षेत्रच पाण्याखाली गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अचानकपणे इतके पाणी आले कुठून असा प्रश्न कारखानदारांनी उपस्थित केला आहे. मुळात हे पावसाचे पाणी नव्हतेच, दुसऱ्या कुठून धरणातून वैगरे पाणी सोडल्याचा संशय ही काही कारखानदारांनी व्यक्त केला आहे. जर अशा प्रकारे पाणी सोडण्यात येत असेल तर  त्याची पूर्वकल्पना तरी कारखानदारांना दिली पाहिजे.परंतु त्याची योग्य माहिती दिली जात नसल्याने मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे कारखानदारांनी सांगितले आहे.

कोट

वसईतील बहुतांश कारखान्यात अचानकपणे पाणी आल्याने याचा उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अनेक उद्योजकांचे लाखो व करोडो रुपयांच्या घरात नुकसान झाले आहे.

विजेंद्र पवार, कारखानदार वसई