Vasai Dahi Handi 2025 Celebration : वसई: वसई विरार शहरात शनिवारी दहीकाला उत्सव  मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रिमझिम पावसाचा आनंद घेत एका वर एक मनोरे रचत गोविंदां पथकांनी सलामी देत  मानाच्या दहीहंड्या फोडल्या. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ ही पाहायला मिळाली.

श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर वसई विरारमध्ये दहीकाल्याच्या दिवशी सकाळपासून दहीहंड्या फोडण्यास सुरूवात झाली होती. दहीहंडी फोडण्यासाठी तयार झालेल्या श्री कृष्णाला खांद्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. मुख्य रस्ते , गल्लोगल्ली दहीहंड्या बांधल्या होत्या. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संस्थांनी सुद्धा हंड्याचे आयोजन करण्यात आले होते. सलामी देण्यासाठी  गोविंदापथकांची चढाओढ सुरू होती. पाच थर, सहा थर, सात थर अशा प्रकारे एका एक मानवी मनोरे रचत सलामी देत रोख रक्कम व पारितोषिकांची लयलूट केली जात होती.

विशेषतः यात महिला गोविंदा पथकांचा सहभाग दिसून आला तर या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लहान मुले, महिला वर्ग, नागरिक यांनी गर्दी केली होती. तर काही ठिकाणी गोविंदा रे गोपाळाच्या घोषणा, बेंजो  ढोलताशांचा ताल, ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम, घरात नाही पाणी घागर उताणी, आला रे आला गोविंदा आला,अशा विविध  गाण्यांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. तर सार्वजनिक दही हंडीच्या ठिकाणी नृत्य, लावण्या असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

तर काही भागात इमारतीच्या गॅलरीतून उत्साहाने होणारा पाण्याचा मारा सुरू होता, तसेच  विविध प्रकारची वेशभूषा करून बाळ गोपाळ यात सामील झाले होते.अशा जल्लोषाच्या वातावरणात गोपाळकाला शहरात साजरा झाला.

राजकीय पक्षांची चढाओढ 

वसई विरार शहरात आगामीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपली छाप सोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लाखोंच्या दहीहंड्या आयोजित केल्या होत्या. यात शिवसेना शिंदे गट, मनसे, बविआ, भाजपा, शिवसेना ठाकरे गट यांचा समावेश होता. वसई अंबाडी रोड, पंचवटी नाका, वसंत नगरी , आचोळे, नायगाव, मनवेलपाडा यासह इतर पन्नासहून अधिक ठिकाणी हंड्या बांधण्यात आल्या होत्या. तर काही गोविंदांना पथकांना राजकीय पुढाऱ्यांनी आपली जाहिरात व्हावी यासाठी टीशर्ट सुध्दा दिल्याचे चित्र पहायला मिळाले. 

गोविंदां पथकांची संख्या वाढती

दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या खेळातील स्पर्धा अधिकच वाढली आहे. वसई विरार शहरातही हळूहळू लाखो रुपये रकमेच्या दहीहंड्या आयोजित होत असल्याने गोविंदा पथकांची संख्या वाढली आहे. मागील दोन वर्षात ८० ते ९० इतकी होती यावर्षी पथकांची संख्या ९९ इतकी झाली आहे.

शहरात तीन गोविंदा जखमी

शहरात विविध ठिकाणी गोविंदा पथकांनी यशस्वीपणे थर रचत दहीहंडीचा उत्सव साजरा केला. तर काही ठिकाणी थर रचताना झालेल्या गडबडीमुळे अपघात होऊन तीन गोविंदा जखमी झाले. यात हाताला मार लागल्याने रोहन गुप्ता (१९) जखमी झाला. सर्वेश डांगे (२२) याच्या डोक्याला मार लागला असून तन्मय तेली (१४) याच्या हाताला मार लागला आहे. या तिघांवरही पालिकेच्या विजय नगर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.