scorecardresearch

महामार्ग राडारोडय़ाच्या विळख्यात; वसई पूर्व भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राडारोडा

वर्सोवा पुलापासून ते शिरसाडपर्यंतच्या भागात सर्रास हा सगळा राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे महामार्ग विद्रुप दिसत आहेत.

mumbai ahmedabad national highway
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राडा रोडा

वसई : वसई पूर्व भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राडा रोडा आणून टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे महामार्ग आता राडा रोडय़ाच्या विळख्यात सापडू लागला आहे.

मुंबई गुजरातसह इतर शहरांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाच्या कडेला राडारोडय़ाचे ढिगारेच्या ढिगारे टाकून दिले जात आहेत. मुंबईसह विविध ठिकाणी विकास कामे ही झपाटय़ाने सुरू आहेत. तर विविध ठिकाणी जुनी बांधकामे तोडली जात आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात सिमेंट काँक्रीटचे तुटलेले साहित्य व इतर साहित्य निघू लागले आहे.

त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता महामार्गाचा वापर होऊ लागला आहे. वर्सोवा पुलापासून ते शिरसाडपर्यंतच्या भागात सर्रास हा सगळा राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे महामार्ग विद्रुप दिसत आहेत.

महामार्ग प्राधिकरणाचे या सगळय़ा प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस हा राडा रोडा आणून टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: रात्रीच्या सुमारास हा राडारोडा आणून टाकला जातो. सेवा रस्त्यावर ही राडा रोडा टाकला जात असल्याने सेवा रस्ते गिळंकृत होत आहेत.

कारवाईत अडथळे

मुंबईसह विविध ठिकाणी करण्यात उत्खनन केलेली माती, तोडण्यात आलेली बांधकामे माती मिश्रित राडारोडा हा एकत्रित करून हा रस्त्याच्या कडेला आणून टाकला जात आहे. तर काही ठिकाणी खासगी जागेत ही आणून टाकला जात आहेत. राडारोडा हा गौण खनिजमध्ये येत नाही. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची रॉयल्टी काढली जात नाही. याचाच गैरफायदा घेत अनधिकृत भराव हे मुख्यत्वे रात्री अपरात्री वाहतूक करून होत आहेत. याबाबत अनेक तक्रारी ही महसूल विभागाकडे येतात. मात्र, राडारोडा यावर दंड आकारण्याची कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने कारवाई करणार तरी कशी असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

पथके नेमून कारवाई करा

महामार्गाच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या राडारोडय़ामुळे महामार्गाची कचराभूमीच होऊ लागली आहे. जे या भागात राडारोडा टाकत आहेत त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पथके तयार करून गस्त घालण्यात यावी व जे छुप्या मार्गाने राडारोडय़ाच्या गाडय़ा रिकाम्या करीत त्यांच्यावर कारवाई करा.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 05:30 IST