वसई: गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि जेवणावळीसाठी केळीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे यंदाही केळीच्या पानांची मागणी वाढली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना यातून रोजगाराची संधी मिळत आहे. सणासुदीच्या काळात केळीचे पान एक नैसर्गिक पत्रावळी म्हणून वापरले जाते आणि विशेषतः गणेशोत्सवात त्याला अधिक मागणी असते.
सणासुदीच्या काळात केळीच्या पानांचा विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. श्रावण महिन्यापासूनच येणाऱ्या विविध सणात केळीची पाने जेवणासाठी एकप्रकारे पत्रावळी म्हणून वापरली जाते. विशेषतः गणेशोत्सव काळात या पानांना अधिक मागणी असते. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून केळीच्या पानांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक जंगलात किंवा शेतांमध्ये जाऊन केळीची पाने गोळा करतात आणि त्यांची विक्री करतात. गोळा केलेल्या पानांचे भारे तयार केले जातात. एका भाऱ्यात साधारणपणे ४० ते ५० पाने असतात आणि त्याची विक्री ४०० ते ५०० रुपयांना केली जात आहे. गेल्या वर्षी हाच भारा ३०० ते ३५० रुपयांना विकला जात होता. वाढलेली महागाई आणि पानांची कमी उपलब्धता यामुळे यंदा दरात शंभर रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
विघटन होण्यास सोपे
केळीचे पान हे पौष्टिक गुणधर्म असलेले पान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच केळीचे पान हे पर्यावरण पूरक असल्याने जेवणानंतर ते पान टाकून दिल्यानंतर त्याचे लगेच विघटन होते. इतर पत्रावळ्या असतात त्याचे विघटन लवकर होत नाही याउलट कचराच अधिक होतो.
केळीच्या पानांचे महत्त्व कायम
बदलत्या हवामानामुळे आणि इतर कारणांमुळे केळीच्या झाडांची संख्या कमी होत आहे. तसेच, बाजारात कागदी आणि इतर पत्रावळ्या आल्यामुळे केळीच्या पानांचा वापर कमी झाला होता. मात्र, ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये आजही गणेशोत्सवादरम्यान जेवणावळीसाठी केळीच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांचे महत्त्व टिकून आहे. अनेक कुटुंबांसाठी हा एक पारंपरिक सण साजरा करण्याचा आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा मार्ग ठरत आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही आधार मिळत आहे.