कल्पेश भोईर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने चित्रशाळेत गणेश मूर्ती तयार करण्याच्या व रंगरंगोटी करण्याच्या कामाला वेग आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात रंगीबेरंगी कापडी फेटे, नेसविलेले धोतर यासह हिरेजडित मूर्ती भाविकांना भावल्या असल्यामुळे त्यांची मागणीही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

मागील दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव एकदम साधेपणाने साजरा झाला होता. मात्र यंदा सर्व र्निबध शिथिल झाल्याने यंदाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत.  फेटा हा महाराष्ट्रात रुबाबदारपणाचे प्रतीक म्हणून असल्यामुळे त्याचा वापर  मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी केला जात आहे. पैठणी, जरीचे कापड अशा विविध रंगांचे कापड घेऊन हे फेटे तयार करून मूर्तीची सजावट केली जात आहे. याशिवाय  कापडी धोतर नेसविले जात आहे. त्यावर  आकर्षक असलेल्या कलाकुसरीमुळे फेटे व धोतर अधिकच मूर्तीची शोभा वाढवीत असल्याने अनेकजण  अशाच मूर्तीना पसंती देत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.  मूर्ती अधिक आकर्षक दिसावी यासाठी  मुकुट व गणेशाच्या अंगावरील आभूषणे ही हिरेजडित करवून घेतली जात आहे. हिरे लावण्याचे काम हे अधिक बारकाईने करावे लागत आहे. एका मूर्तीला तयार करण्यासाठी साधारणपणे अर्धा ते एक दिवस इतका कालावधी जातो. मूर्ती मोठी असेल व त्यातील काम जास्त असेल तर दोन दिवस लागतात असे मूर्तिकार अजित पाटील यांनी सांगितले आहे. 

कामे अंतिम टप्प्यात

वसई, विरारमध्ये विविध  भागात गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. यावर्षी शासनाने घरगुती व सार्वजनिक अशा गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल केले आहेत.  यामुळेच वसईच्या विविध चित्रशाळेत शाडू मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस अशा गणेश मुर्ती तयार करण्याच्या व त्यांना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्राहक ही गणेशमुर्तींची नोंदणी करण्यासाठी कलाकेंद्रात येऊ लागले आहेत. शहरातील अनेक ठिकाणच्या चित्रशाळेत ६० टक्कय़ांहून अधिक नोंदणी झाली आहे. तसेच यावर्षी मूर्तीच्या किंमतीत ही पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

यंदा अनेक ग्राहकांना फेटा व हिरे सजावट व धोतर लावण्यात आलेल्या मूर्ती हव्या आहेत. त्यानुसार मूर्तीची सजावट करण्याचे काम सुरू आहे. तर काहींना मातीच्या हव्या आहेत त्या बनवून  ठेवल्या आहेत.

  – प्रेमेश पाटील, त्रिमूर्ती आर्ट्स कलाकेंद्र.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees buy distinctive ganesha increase demand idols dressed ysh
First published on: 23-08-2022 at 00:02 IST