वसई : वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला असून त्यावर आलेल्या १६० हरकती व सूचनांवर बुधवारी सुनावणी पार पडली. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत.
वसई विरार महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता. या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मुदतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत महापालिकेकडे १६० हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. विशेषतः यात २९ गावांतील दोन हजाराहून अधिक नागरिकांच्या सामूहिक हरकतींचा ही समावेश होता.
बुधवारी यावर महापालिकेच्या सभागृहात महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेले सार्वजनिक आरोग्य विकास मंत्रालयाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपस्थित होते.यावेळी १६० हरकतदारांपैकी १५४ हरकतदार उपस्थित होते. प्राप्त हरकती-सूचनांचे स्वरूप व हरकतदारांचे म्हणणे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांची पडताळणी करून अंतीम अभिप्रायाचा मसुदा नगर विकास विभागास सादर केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
अंतिम प्रभाग रचनेकडे लक्ष
वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. मात्र करोना काळामुळे निवडणूक लांबणीवर पडली. तेव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. पाच वर्षांनंतर निवडणूका होणार असल्याने राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. २९ प्रभागात ११५ नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. घेण्यात आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर नंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.