वसई: नालासोपारा शहर हे अमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे. तुळींज पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात छापा टाकून ५ कोटी ६० लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक केली आहे. तिचा साथीदार फरार आहे.
नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहे. हे नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रीय आहेत. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर परिसरात एक महिला अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळी महिला पथक तयार करून पाठविले. यावेळी एक महिला आपल्या घरातच अमली पदार्थ तयार करून विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून एम डी ( मॅफेड्रोन) नावाचा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल व इतर साहित्य असा सुमारे ५ कोटी ६० लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी नायजेरियन महिला रिटा फाती कुरेबेवू (२६) हिला अटक करण्यात आली आहे. तिचा साथीदार फरार झाला आहे. त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क), २२,२९ सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार असलेल्या हेन्री नावाच्या व्यक्तीचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांनी सांगितले आहे.