भाईंदर : निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आगामी निवडणुकीसाठी मिरा-भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या रचनेनुसार २४ प्रभागात ९५ नगरसेवक राहणार आहेत. यावर नागरिकांना येत्या १५ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.

राज्यात रखडलेल्या महापालिका निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने शासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना व इतर तयारी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने मिरा-भाईंदर महापालिकेने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करून ती राज्य सरकारमार्फत अंतिम मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. अखेर या प्रभाग रचनेला आयोगाने बुधवारी मान्यता दिली आहे.

त्यामुळे आता ही प्रभाग रचना प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी महापालिकेने त्याची प्रत महापालिका मुख्यालय व सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तसेच ती महापालिकेच्या संकेतस्थळावरही पाहता येणार आहे. हरकती व सूचना नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

चार सदस्यीय प्रभाग :

मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहित धरली जाणार असून, चार सदस्यीय प्रभाग पद्धती व नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच ९५ एवढीच राहणार आहे. मागील वेळी २४ पैकी २३ प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग तीन सदस्यीय होता. तीन सदस्यांचा प्रभाग उत्तन भागात होता. याही वेळेस हीच रचना कायम राहणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.