भाईंदर : मिरा भाईंदर शहरात बनावट मद्यविक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट मद्यविक्री प्रकरणी ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करीत तीन मद्य दुकानांना टाळे ठोकले आहे.मिरा रोड येथील काशिमीरा आणि पेणकर पाडा भागात बनावट मद्यविक्री विक्रीचे प्रकरण काही दिवसापूर्वीच उजेडात आले होते. यातील आरोपी रामकेश सीताराम गुप्ता याची चौकशी केली असताना त्याने भिवंडी मधून ही मद्य येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने भिवंडी जिल्ह्यातील कोनगाव गावातील एका सदनिकेतून कार्यरत असलेल्या बनावट मद्याच्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला होता. यामध्ये बिसलेरीच्या पाण्यात दारू मिळवून पुन्हा बॉटल सीलपॅक करण्याचा प्रकार केला जात होता.

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु ठेवल्यानंतर ही दारू संपूर्ण जिल्ह्यात विक्री साठी जात असल्याचे समोर आले. तर नवीमुंबई आणि भाईंदर येथे या मद्य बाटल्यांचे प्रमुख खरेदीदार असल्याची तक्रार उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावरून मिरा भाईंदर मधील चेतन वाईन शॉप ची दोन दुकाने व दादर वाईन शॉप अशा तीन मद्यविक्री दुकानांना टाळे ठोकले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

“जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आल्यामुळे चेतन वाईन शॉप सील करण्यात आले आहे. यात बनावट मद्यविक्री केल्याची तक्रार असून त्याची पुढील तपास सुरू आहे.” खाडे – उप पोलीस निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क- ठाणे विभाग )

परराज्यातून मद्यसाठा ?

मागील काही वर्षांपासून मद्य विक्रीचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवसेंदिवस मद्याची मागणी वाढत असल्याने सिल्वास, दमण अशा भागात स्वस्त मद्य मिळत असल्याने तो साठा ही छुप्या मार्गाने शहरात येत असावा असा संशय ही नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

ग्राहकांची फसवणूक

मद्याच्या बाटल्यांची किंमती ही वाढल्या आहेत. प्रत्येक ब्रँड नुसार त्या किंमती घेतल्या जातात. मात्र पाणी किंवा भेसळयुक्त साहित्य टाकून बनावट मद्य तयार केले जात असल्याचे प्रकार घडत असल्याने एक प्रकारे ग्राहकांची फसवणूक होऊ लागली आहे. काही मद्याविक्रेते देखील अधिक नफा कमविण्याच्या नादात अशी विक्री करतात त्यांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.