भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थाकरिता मोबाइल टॅब देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी पार पडलेल्या महासभेत बहुमताने विद्यार्थ्यांना मोबाइल टॅब घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेच्या शिक्षण विभागाला विद्यार्थी संख्या अहवाल सादर करण्यास सांगितले असून एक समिती घटित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.

नव्या शैक्षणिक वर्षांला ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली असताना मीरा भाईंदर महानगरपालिका शाळेत शिकत असलेले गरजू विद्यार्थी शाळा बंद असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिले असल्याचे आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासने यावर गांभीर्याने लक्ष देऊन शाळा सुरू करण्याची महासभेत नगरसेवकांनी केली होती.

करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना अधिक बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे लसीकरण पूर्ण होईपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन पद्धतीने नवी शिक्षण प्रणाली राबवून ७ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र पालिका शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थाकडे सामुग्रीचा अभाव असून प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्यामुळे अद्यापही शाळा सुरू करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे.

मीरा भाईंदर शहरात महानगरपालिकेच्या एकूण ३५ शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार १७० इतकी होती. यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाइल फोन नसलेल्यांची संख्या ७०० आहे तर १९६७ विद्यार्थ्यांकडे साधे फोन आहेत. तसेच दूरदर्शन द्वारे केवळ २५०५ विद्यार्थ्यांपर्यंतच शिक्षण पोहतच आहे. तर केवळ २१६६ विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन असल्यामुळे त्यांना झूम आणि व्हाट्सअँपद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात होते.

मात्र या चालू शैक्षणिक वर्षांत अद्यापही नव्या विद्यार्थाची पट संख्या निर्धारित करणे, त्याचे सर्वेक्षण करणे आणि ऑनलाइन वर्ग भरवण्यासारखी कामे पूर्ण झाली नसल्यामुळे शाळा बंदच असल्याचे गंभीर आरोप सत्ताधारी पक्षाचे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी महासभेत केले आहेत.

शाळा सुरू आहे मात्र अद्यापही यंदाची पट संख्या निर्धारित करण्यात आलेली नाही. सध्या नवीन अ‍ॅडमिशन सुरू आहेत.

– ऊर्मिला पारधे, शिक्षणाधिकारी