वसई : दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात मैत्री दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मैत्रीच्या या खास नात्याचे प्रतीक म्हणून या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधतात आणि भेटवस्तू देतात. याच मैत्री दिनाच्या निमित्ताने वसई शहरातील बाजारपेठा सध्या विविध प्रकारच्या फ्रेंडशिप बँड्स, ब्रेसलेट्स आणि आकर्षक भेटवस्तूंनी सजल्या आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत साऱ्यांनीच आपल्या मित्रमैत्रिणींनीसाठी फ्रेंडशिप बँड घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. वसई रेल्वे स्थानक परिसरातील महाविद्यालयांची संख्या मोठी आहे त्यामुळे इथली दुकाने आणि वातावरण सध्या मैत्रीच्या रंगात रंगून गेल्याचे चित्र आहे.
आकर्षक बॅण्ड्सनी सजली दुकाने
रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड्सची दुकाने लागली आहेत. यंदा साध्या कापडाच्या किंवा रबराच्या बँड्ससोबतच आधुनिक आणि आकर्षक डिझाइन्सनी बाजारपेठ सजली आहे. सध्याच्या पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, थोडे कोरीव काम असलेले, वेगवेगळ्या धाग्यांनी विणलेले आणि नक्षीदार फ्रेंडशिप बँड्स तरुणाईला आकर्षित करत आहेत.
यावर्षीचा नवीन ट्रेण्ड् काय?
खासकरून यंदाच्या बाजारात मुलांसाठी गडद रंगांचे, मणी आणि लॉकेट असलेले चामड्याचे ब्रेसलेट बँड्स उपलब्ध आहेत. तर मुलींसाठी रोजच्या वापरात येतील असे साखळीसारखे, चमकदार मणी गुंफलेले खास ब्रेसलेट बाजारात दिसत आहेत. याशिवाय, विविध आकार आणि रंगांच्या तसेच ‘बेस्ट फ्रेंड’सारखे संदेश लिहिलेल्या अंगठ्याही तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. हे बँड्स आणि ब्रेसलेट्स २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध असल्यामुळे अनेकजण आपल्या बजेटनुसार खरेदी करताना दिसत आहेत.
फ्रेंडशिप बँड्ससोबतच भेटवस्तूंच्या दुकानातही खास सजावट करण्यात आली आहे. टेडी बिअर, कॉफीचे कप, फोटो फ्रेम्स, भेटकार्ड, पेन आणि फुलांचे गुच्छ अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रविवारची सुट्टी असल्याने अनेक शाळकरी मुलांनी शनिवारी आणि काही मुलांनी शुक्रवारीच मैत्री दिवस साजरा केला. एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधून आणि लहान-मोठ्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करून त्यांनी हा दिवस आनंदात साजरा केला.