भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील उद्यानात खेळणी, रबर मॅट आणि व्यायामाचे साहित्य बसवण्यासाठी नुकतीच पाच कामास प्रशासनाने मंजूरी दिली आहे.यासाठी शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा योजने अंतर्गत निधी मंजुर करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर शहरात सध्या सुमारे ८९ उद्याने, दहा मैदाने आणि दोन चौपाटी परिसर आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात. त्यामुळे त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यावर महापालिकेचा भर आहे. या सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश आहे. तसेच, पर्यावरण पूरक वातावरणासाठी बागांची निर्मिती आणि त्यात लहान मुलांसाठी खेळणी तसेच प्रौढांसाठी व्यायाम साहित्य बसवले जाते.मात्र, मागील काही वर्षांपासून अनेक उद्यानांमध्ये ही साधने अनुपलब्ध असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. निधीअभावी ही कामे रखडली होती. त्यामुळे शासनाकडे विशेष निधीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी या कामासह खर्चास अधिकृत मंजूरी दिली आहे.

नुकसानाचे सत्र सुरूच

मिरा भाईंदर शहरातील उद्यानात खेळणी व व्यायामाचे साहित्य बसवण्याचे कंत्राट महापालिकेने मे.बाबा प्ले वर्ल्ड या संस्थेनीकडे दिले आहे. याच संस्थेकडे २०२३ ते २०२५ दरम्यान शहरातील उद्यानात मोडकडीस येणाऱ्या साहित्याच्या दुरुस्तीची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.परंतु तरी देखील शहरातील काही उद्यानात खेळणी आणि व्यायामाचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.त्यामुळे महापालिकेच्या साहित्यांचे नुकसान करणाऱ्यांवर आणि ते साहित्य दुरुस्ती करण्यासाठी पैसे देऊनही काम न करणाऱ्यांवर आजवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.