भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत दाहिनीवर अंत्यविधी घडत असताना चक्क गॅस संपला असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मृतदेहावर तब्बल तीन दिवसांनंतर अंत्यविधी पूर्ण झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे.
गेल्या दीड वर्षांत करोना आजाराने थैमान घातल्याने मृतदेहांवर विद्युतदाहिनीमार्फत अंत्यविधी पार पाडण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत शनिवारी रात्रीच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीतील अंत्यविधी सुरू असताना दाहिनी बंद पडली. त्यामुळे मृतदेह केवळ अर्धवट अवस्थेत जळाला असल्याचे समोर आले आहे. दाहिनीमधील गॅस पुन्हा भरण्याकरिता प्रशासनाला तब्बल तीन दिवसांचा कालावधी लागला. स्मशानभूमीतील दाहिनी सुरू ठेवण्याकरिता प्रशासनाकडून कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या कामाची निविदा संपल्यामुळे त्या दिवशी गॅसची कमतरता निर्माण झाली होती, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले.