वसई: गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला असताना, वसई विरार शहरात सार्वजनिक गणपती मंडळांकडून मंडप उभारले जात आहेत. तर काही ठिकाणी गणपतींचे आगमन देखील झाले आहे. पण अशातच सोमवार आणि मंगळवारी कोसळलेल्या पावसाचा तडाखा मंडळांच्या मंडपांना बसला आहे. चौकात, रस्त्याच्याशेजारी, तसेच विविध गृहसंकुलात गणपती उत्सवासाठी उभारलेले मंडप पाण्याखाली गेले असल्याचे चित्र वसई शहरात निर्माण झाले आहे.
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशेत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहरातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. शहरात सातशेहून अधिक सार्वजनिक गणपती मंडळं आहेत. या मंडळांद्वारे शहरात तसेच ग्रामीण भागात विविध ठिकाणी मंडप उभारले जातात. तर गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा शिल्लक असताना बऱ्याच ठिकाणी हे गणपती मंडळांचे मंडप उभारणीचे काम अंतिम टप्पयात आले आहे. पण, सोमवार आणि मुख्यत्वे मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका या मंडपांना बसला असल्याचे दिसून येत आहेत.
वसई विरार शहरात रस्त्याच्या कडेला, चौकात, तसेच गृहसंकुलांमध्ये मोठमोठाले गणपती मंडप उभारण्यात आले आहेत. पण, मंगळवारी पडलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. हे साचलेले पाणी काही मंडपात देखील शिरले तर वाऱ्यामुळे काही ठिकाणी मंडपांवर टाकण्यात आलेली ताडपत्री देखील उडून गेल्याचे गपणती मंडळाकडून सांगण्यात येत आहे. तर मंडपाच्या सजावटीचे कामही पावसामुळे काही काळ थांबवले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बुधवारी सकाळपासून जरी हळू हळू शहरातील जनजीवन पुर्वपदावर येत असले, तरी अजूनही बऱ्याचशा भागातील पाणी तसेच साचून आहे. खासकरून विविध ठिकाणी गृहसंकुलातील पाणी ओसरले नसल्यामुळे तेथील मंडपातील सजावट आणि इतर तयारी करणे मंडळाला अशक्य होऊन बसले असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले आहे.