सामाजिक भान राखत प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जन न करण्याची प्रथा कायम
वसई : सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना वसईतील एक आगळावेगळा घरगुती गणपती आकर्षणाचा विषय ठरला आहे. मागील ९० वर्षांपासून हा घरगुती गणेशोत्सव साजरा होत असून त्याचे एकदाही विसर्जन करण्यात आलेले नाही. विसर्जन न करता गणेशाची मूर्ती पुन्हा देव्हाऱ्यात ठेवली जाते. यामागे धार्मिक भावना असली तरी कुटुंबाच्या पुढील पिढीने सामाजिक भान राखत प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जन न करण्याची प्रथा पुढे सुरू ठेवली आहे.
गणेशोत्सवाचे विसर्जन करताना तलावांचे प्रदूषण होत असते. विसर्जन मिरवणुकीच्यावेळी वाहतूक कोंडी होते आणि ध्वनिप्रदूषण होते. या गोष्टी टाळण्यासाठी वसईतील पिळणकर कुटुंबाने घरच्या गणपतीचे विसर्जन न करण्याचा अनोखा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही प्रथा कायम आहे. पिळणकर कुटुंबात मागील ९० वर्षांपासून आगळावेगळ्या गणेशोत्सवाची स्थापना होत आहे. मात्र दरवर्षी नवीन मूर्ती न आणता घरातील देव्हाऱ्यातील गणपतीच्याच मूर्तीची ११ दिवसांसाठी स्थापना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन न करता ती पुन्हा देव्हाऱ्यात ठेवली जाते. यंदाचे हे ९०वे वर्ष आहे. या परंपरेविषयी बोलताना संजय पिळणकर यांनी सांगितले की, आमच्या आजोबांना शिवाजी पार्कच्या मैदानात ही शाडूची गणपतीची मूर्ती सापडली होती. त्यावेळी योगायोगाने गणेशोत्सवाचा काळ होता. आजोबांना स्वप्नात साक्षात गणपतीनेच मूर्तीचे विसर्जन करू नको असे सांगितले. त्यामुळे आजोबांनी मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली. तेव्हापासून आमच्या घरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली पण मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रथा आम्ही कायम ठेवली आहे. अनंत चतुर्थीला गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन न करता विधिवत उत्तरपूजा करून गणेशाची मूर्ती कपाटात ठेवली जाते आणि पुढील संकष्टीला विधिवत पूजा करून पुन्हा देव्हाऱ्यात ठेवली जाते, असे त्यांनी सांगितले. ही मूर्ती शाडूची असून ९० वर्षांपासून एकदाही खराब झालेली नाही. फक्त आम्ही मूर्तीला दोन वर्षांतून एकदा रंगवतो असे दिलीप पिळणकर यांनी सांगितले.
दरवर्षी घरात चलचित्र
घरगुती गणेशोत्सवात चलचित्र ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शहरी भागात तर दुर्मीळच असते. मात्र पिळणकर यांच्या घरात दरवर्षी चलचित्राद्वारे विविध देखावे साकारले जातात. यंदा त्यांनी महाराष्ट्राच्या वारी संस्कृतीवर चलचित्राद्वारे प्रकाश टाकला आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या विविध संस्कृती, धार्मिक परंपरा तसेच समाजप्रबोधन करणारे देखावे चलचित्राद्वारे साकारले होते.