वसई:- वसई विरार शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.विविध ठिकाणच्या भागात कचरा हा उघड्यावरच टाकला जात आहे. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसई विरार शहरात पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील दैनंदिन स्वच्छता केली जाते. व जमा होणारा कचरा कचरा भूमीवर नेऊन टाकला जातो. मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण अधिकच वाढू लागले आहे. बहुतेक जण कचरा कुंडीत टाकता थेट रस्तावर किंवा कडेला टाकून निघून जात आहेत. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

नायगाव, सातीवली रस्ता, भोयदापाडा, धानिव बाग, नालासोपारा फाटा, संतोष भवन, नायगाव उमेळा फाटा रस्ता, विरार मुख्य रस्त्या लगत यासह अंतर्गत रस्ते अशा विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.

त्यातून दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे  नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.पालिकेचे स्वच्छता विभाग केवळ दिखाऊ कारवाई करत आहेत, मात्र प्रत्यक्षात योग्य कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्था करण्यात ते अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शहरात दररोज स्वच्छता करून कचरा उचलला जातो. ज्या भागात कचरा साचलेला असेल तोही संबंधित विभागातील स्वच्छता निरीक्षक यांना सांगून उचलला जाईल असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अतिकचऱ्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण

वसई विरार शहरात अतिकचऱ्याची ठिकाणे आहेत त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या ज्या भागात जास्त प्रमाणात कचरा टाकला जातो तिथे काही कलाकृती उभारण्याचे विचाराधीन आहे असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

फेरीवाल्यांना आवर घाला

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात फेरीवाले आपले बस्तान मांडून बसत आहेत. मात्र ते सुद्धा कचरा जागच्या जागी टाकून निघुन जात असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा निघत आहे. नायगाव पूर्वेच्या स्थानक परिसरात बसणारे फेरीवाले थेट कांदळवन व खाडीपात्रात व पुलाच्या जवळच कचरा टाकून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्यासह जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.