भाईंदर : घोडबंदर मार्गावरील वर्सोवा खाडी पूल आणि गायमुखजवळील करपे कंपाउंड भागात सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असून कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.मंगळवारी सकाळपासूनच मिरा-भाईंदर शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत व रस्त्यावर पाणी साचले आहे. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारे पाणी रस्त्यावर आल्याने घोडबंदर घाट मार्गावरही पाणी साचले आहे. विशेषतः वर्सोवा पूल आणि करपे कंपाउंड भागात रस्त्यावर दीड ते दोन फूटापर्यंत पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले आहे.

त्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनांची गती मंदावली आहे. परिणामी वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. सलग दोन दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ही समस्या सुरू असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

उपाययोजना फोल

घोडबंदर मार्गावरील पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यात रस्त्याच्या कडेला पाणी उपसण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. तसेच जेसीबीच्या मदतीने पाण्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करण्याचे काम केले जात आहे. याशिवाय वाहनांना पुरेशी जागा मिळावी म्हणून रस्त्यावरील दुभाजकही मोडण्यात आला आहे.मात्र डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने, तसेच येथील नाले व ओढे भरून वाहत असल्यामुळे पाण्याचा पुरेसा निचरा होत नसल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.