वसई: पावसाळ्यात डोंगरात, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात हिरवे गवत उगवले आहे. शेतमजूर या गवताची चार कापून त्याचे भारे तयार करून विक्री करीत आहेत. याविक्रीतून मजुरांना हंगामी रोजगार मिळू लागला आहे.
दरवर्षी भाताची लागवड, बेननी अशी शेतीची कामे पूर्ण करून झाल्यानंतर आपल्या संसाराला हात भार लागावा यासाठी गुरांना लागणारी चाऱ्याची विक्री करतात. यासाठी पावसाळ्यात शेता बांधावर , रान माळावर उगवणाऱ्या गवताची कापणी केली जाते. व त्याचे भारे तयार करून त्याची विक्री केली जाते.
यंदाच्या वर्षी ही या मजुरांनी आपल्या शेतीची कामे आटोपून रानमाळावर उगवणारा चारा गोळा करून त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. या विक्रीतून दोन पैसे हाती येत असल्याने संसाराला चांगला हातभार लागू लागला आहे.
या चाऱ्याला वसई विरार , मुंबई यासह विविध भागांतील दुग्धउत्पादक यांची चांगली मागणी असते. यासाठी मजुरांनी कापून ठेवलेला चारा खरेदी करण्यासाठी चारा पुरविणारे व्यापारी येतात. ते व्यापारी ट्रकद्वारे दररोज ठरलेल्या ठिकाणी ट्रक उभा करून त्या त्या भागातील चारा खरेदी केला जातो. एक मजूर दिवसाला साधारणपणे ४०० ते ५०० किलो इतका चारा कापतात काही वेळा जास्त ही कापणी केली जातो. हा चारा एक ते दोन रुपये प्रातिकिलोने विकला जात आहे. चारकापणी करून चारा विक्रीतून चार पैसे मिळू लागल्याने मजुरांना चांगला दिलासा मिळाला आहे.
या तीन-चार महिन्यांच्या हंगामात शेतमजुरांना २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत सहज कमाई करता येते. भात शेतीच्या कामानंतर फारसा कामधंदा मिळत नसताना, हा हिरवा चारा त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतो, असं चारा विक्रेत्या मजुरांनी सांगितले आहे.
चारा गोळा करण्यात अडचणी
पावसाळी हंगामात हिरवा चारा सहज उपलब्ध होत असला तरी, तो गोळा करणे सोपे नाही. गवताच्या ठिकाणी काम करत असताना जंगली कीटक आणि डासांचा डंख सहन करावा लागतो. शिवाय, पावसाळ्यात वाढलेल्या गवतात विषारी साप किंवा विंचू लपलेले असण्याचीही भीती असते. त्यामुळे, काम करताना शेतमजुरांना विशेष खबरदारी घ्यावी लागते.