विरार : पुढील तीन दिवस पालघर जिल्ह्यासह वसई विरार परिसराला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोमवारी पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शहरात पाहणी केली. यावेळी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

वसई विरार शहरात मागील तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या दिवसात शहरात आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच काही भागांत प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली. सध्या शहरात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडून ५४ पंप लावण्यात आले असून चोवीस तास कर्मचाऱ्यांना देखरेख करण्यास सांगितले आहे. तसेच उन्मळून पडलेली झाडे हटविणे, कचऱ्यामुळे बंद झालेली गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा करून परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी अग्निशमन विभाग, पालिकेचे मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुसज्ज ठेवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. 

स्वच्छता विभागाला सूचना

पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेता स्वच्छता यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. यात जंतुनाशक फवारणी वेळोवेळी करणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर 

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेता दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या नागरिकांना पालिकेच्या तात्पुरत्या संक्रमण शिबिराच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क 

आपत्कालीन परिस्थितीत मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रासह सर्व प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरु राहणार आहेत. यावेळी ०२५०-२३३४५४६/ २३३४५४७/ ७०५८९१११२५ आदी संपर्क क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा असे यावेळी पालिकेकडून सांगण्यात आले.