वसई : वसई विरार शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका महापालिकेच्या परिवहन सेवेला ही बसला आहे. विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यात बस बंद पडत आहेत. त्यामुळे पालिकेची परिवहन सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे.

वसई विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरातील ३६ मार्गावर परिवहन सेवा पुरविली जात आहे.
या बस मधून दररोज ७० हजाराहुन अधिक प्रवासी प्रवास करतात. गेल्या तीन चार दिवसापासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे वसई विरार भागातील बहुतेक भागात पाणी साचले असल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते आहेत. मंगळवारी सुध्दा पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे रस्त्यावर तीन ते चार फूट इतके पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सेवा ठप्प होऊ लागली आहे.

या पूरस्थितीचा फटका महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसला सुद्धा बसला आहे.पावसाच्या पाण्यामुळे शहरात वाहतूक सेवा पुरविणाऱ्या परिवहन विभागाच्या बसेस पाण्याखाली जात असल्याने अनेक ठिकाणच्या भागात बसेस बंद पडण्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळी साडे सात वाजता ई बस १९ आणि सीएनजी, डिझेल ४६ अशा एकूण ६५ बसेस रस्त्यावर सेवेसाठी उतरल्या होत्या. मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्यात बसेस बंद पडून मध्येच अडकू लागल्या आहेत. सकाळपासून वसई पूर्वेच्या भागात ५ वसई पश्चिम २ आणि विरार पूर्व २ अशा ९ ठिकाणी बसेस बंद पडल्या असल्याची माहिती परिवहन सेवेच्या आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. पाऊस सुरू असल्याने आता पालिकेची परिवहन सेवा ही पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे ज्या बसेस आहेत त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले.

ई बस पावसात चालणे कठीण

वसई विरार महापालिकेकडून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या ताफ्यात ४० ई बस आहेत. परंतु पावसात व साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी या बस चालवू शकत नाही. कारण जर त्याच्या बॅटरीला पाणी लागल्यास ती बंद पडून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे असे परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.