वसई : मागील चार दिवसांपासून वसई, विरार शहरात मुसळधार पाऊस पडत असून त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या सेवेवर ही झाला आहे. वसई नालासोपारा दरम्यान रुळावर पाणी असल्याने लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे विरार रेल्वे स्थानकात सकाळ सत्रात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

वसई विरार शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे वसई नालासोपारा या दरम्यानच्या रुळावर ही पाणी साचत असल्याने रेल्वेच्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.बुधवारी सकाळपासून विरार रेल्वे स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. जवळपास २० ते २५ मिनिटे लोकल उशिरा धावत असल्याने याचा फटका प्रवाशांना बसला. विरार रेल्वे स्थानकात ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

मात्र लोकलच उशिराने येत असल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले आहे. आधीच नागरिकांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढत रेल्वे स्थानक गाठले मात्र इथेही रेल्वे सेवेचा खोळंबा यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.तर काहींनी रेल्वे स्थानकातील गर्दी व उशिरा धावत असलेल्या लोकल यामुळे पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरला.