वसई: वसई विरार शहरात मागील काही वर्षांत रिक्षांची संख्या बेसुमार वाढली आहे. या वाढत्या रिक्षांच्या संख्येत निश्चित केलेले रिक्षा थांबे हे अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर रिक्षा थांब्याचे पेव वाढत असून वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत आहे. यासाठी नव्याने सर्वेक्षण करून रिक्षा थांबे निश्चित करण्यात यावे अशी मागणी आता पुढे येत आहे.
परिवहन विभागाकडून रिक्षाचे परवाने खुले होताच शहरात रिक्षांची संख्या ही वेगाने वाढली आहे. सद्यस्थितीत शहरात ३० ते ३५ हजार इतक्या ऑटोरिक्षां आहेत.
या रिक्षां प्रवासी वाहतूक करण्यासाठी उभ्या करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा थांबे निश्चित करून देण्यात आले होते. यात तीनशेहून अधिक रिक्षा थांबा ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते. यात ५ ते ६ थांबे हे महिलां रिक्षाचालकांसाठी राखीव ठेवले होते.त्यातील केवळ १४५ रिक्षा थांब्यांनामंजूरी मिळाली आहे. मात्र वाढत्या रिक्षांच्या संख्येमुळे ते ही आता अपुरे पडत असल्याची तक्रार रिक्षा चालकांच्या संघटनांनी केली आहे.
थांबे निश्चित नाही त्यामुळे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक की वाढली आहे. त्याचा फटका अन्य रिक्षा चालकांना बसत आहे. यासाठी शहरात रिक्षा थांब्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.पुन्हा सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी रिक्षा थांबे तयार करण्यात यावेत अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
पुन्हा सर्वेक्षण करणार
शहरातील रिक्षा थांबे अधिकृत रित्या निश्चित करण्यात न आल्याने त्याचे पुन्हा परिवहन , पालिका, आणि वाहतूक विभाग यांच्या मार्फत पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
याआधीही सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते त्यावेळी २५० ते३०० रिक्षाथांब्याचे सर्वेक्षण झाले होते. परंतु आता वाहनांची वाढती संख्या , जागा अशा अनेक समस्या आहेत यासाठी पुन्हा सर्वेक्षण करून यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
बेकायदेशीर रिक्षा थांब्याचे पेव
पालिका, वाहतूक विभाग, परिवहन विभाग यांच्या मार्फत शहरात रिक्षा उभे करण्यासाठी थांबे निश्चित करणे गरजेचे आहे. परंतु शहरातील रिक्षाथांबे अजूनही निश्चित न करण्यात आल्याने अनिश्चित राहिले आहे. यामुळे शहरात जागोजागी बेकायदेशीर रिक्षा थांब्याचे पेव फुटू लागले आहेत.
रिक्षा मध्येच थांबवणे, प्रवाशांना मध्येच रिक्षात बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणे असे प्रकार सुरू असतात. अशा प्रकारामुळे अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीर थांब्यामुळे वाहने वळविण्यास व नागरिकांना ये जा करण्यास अडथळे निर्माण होतात. यासाठी शहरातील रिक्षाथांबे निश्चित करण्यात यावे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अडथळ्यातून सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहतूक कोंडीत भर
वसई विरार शहरात रिक्षांच्या वाढत्या संख्येसह बेकायदेशीर रिक्षा थांब्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. तर प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेत रेल्वे स्थानक, बाजार, पेट्रोल पंप, बस थांबे, शासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी अस्ताव्यस्त पद्धतीने रिक्षाचालक रिक्षा उभ्या करू लागले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अरुंद रस्त्याच्या कडेला लागलेल्या रिक्षांच्या लांबचलांब रांगांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण होऊन बसले आहे.
