भाईंदर: मिरा भाईंदर शहरात शिवसेना पक्षाच्या वाढत्या शाखांना विरोध करण्याच्या दृष्टीने भाजपनेही रस्त्यावरच पक्षाचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ मे रोजी आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच हे कंटेनर कार्यालय उभारले जाणार असून, याबाबतची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मागील दोन वर्षांत मिरा भाईंदर शहरात शिवसेना पक्षाने पंधराहून अधिक शाखा उभारल्या आहेत. या शाखा मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला व पदपथांवर उभारण्यात आल्या आहेत. याबाबत अनेक तक्रारी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या असल्या, तरी प्रशासनाने राजकीय दबावामुळे कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सध्या शहरात काही ठिकाणी पुन्हा कंटेनर टाकून शाखा उभारण्याचे सत्र सुरू झाले आहे.

त्यामुळे यास विरोध म्हणून भाजपने एक अनोखी भूमिका स्वीकारली असून, १२ मे रोजी भाजपचे देखील पहिले कंटेनर कार्यालय मिरा रोड येथे उभारण्याचे ठरवले आहे. याबाबतची माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी स्वतः प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, हे कंटेनर थेट महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या निवासस्थानाबाहेर उभारले जाणार आहे. त्यामुळे हा वाद आगामी काळात चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणत्याही पक्षाला अशा प्रकारच्या शाखांसाठी परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

“म्हणून आम्ही कार्यालय उभारत आहोत”- आमदार नरेंद्र मेहता“

मिरा भाईंदर शहरात नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर अनधिकृतपणे कार्यालये उभारण्याचा नवा पायंडा पडत आहे. त्यामुळे आम्हीही त्याच धर्तीवर अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे पहिले कंटेनर कार्यालय १२ मे रोजी मिरा रोड येथे उभारत आहोत. यानंतर १५ मे रोजी दुसरे कार्यालय महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणार आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत कार्यालयांवर कारवाई नाहीच

मिरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, शहरात ५२ हून अधिक राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. प्रशासनाने सुरुवातीला या सर्व कार्यालयांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, काही मोजक्याच कार्यालयांवर कारवाई केल्यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली.