वसई :- वसईतील निवृत्त प्राचार्यांना डिजिटल अरेस्टची भीती घालून सव्वा कोटींची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच नालासोपारा येथील एका निवृत्त शिक्षकालाही अशाच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार दिनानाथ मिश्रा (५८) हे निवृत्त शिक्षक असून नालासोपारा पूर्वेच्या संयुक्त नगर येथे राहतात. त्यांना मिळणार्या निवृत्ती वेतनावर (पेंशन) त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ७ मार्च रोजी त्यांना रंजु कुमारी नामक महिलेचा फोन आला होता. ट्राय नोटिफिकेशन सेल मधून बोलत असल्याचे तिने सांगितले. तुमच्या आधारकार्डाच्या आधारे सिम कार्ड घेऊन खंडणी आणि फसवणुक केल्याचा गुन्हा टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे तिने सांगितले. यामुळे मिश्रा घाबरले. त्या महिलेने मिश्रा यांना सीबीआय अधिकारी संदीप राव यांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यावर कॉल करण्यास सांगितले.
मिश्रा यांनी त्या क्रमांकावर कॉल केला असता त्यांना व्हिडियो कॉल वर सीबीआय कार्यालय दाखविण्यात आले. तेथे दोन अधिकारी पोलीस गणवेशात होते. त्यांना मनी लॉंड्रींग केस मध्ये अटक केली जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अटक टाळण्यासाठी मिश्रा यांच्याकडून ४४ लाख रुपये घेण्यात आले. हे पैसे त्यांनी आरटीजीएसद्वारे भरले. त्यांनतर ३ दिवसांनी त्यांना डिजिटल न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे नकली वकील, न्यायाधिश हजर होते. मिश्रा यांना जामिन मिळवून देण्यासाठी पुन्हा २० लाख रुपयांची मागणी कऱण्यात आली. मिश्रा यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन तसेच घरातील दागिने विकून पैसे गोळा केले आणि आरोपीना पाठवले.
७ मार्च ते २३ मार्च या कालावधीत त्यांची तब्बल ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती अधिकार कायद्याच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातत्याने वसई विरार भागात डिजिटल अरेस्ट च्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.