वसई : पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेचा वृक्षप्राधिकरण विभाग सज्ज झाला आहे. शहरातील धोकादायक अवस्थेत असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत शहरात १८१ वृक्ष अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे.

पावसाळ्यात अनेकदा वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे काही भागात झाडं कोसळण्याच्या घटना समोर येत असतात. तर काही ठिकाणी सुकलेल्या अवस्थेत, झाडांच्या फांद्या वाढलेली व धोकादायक अवस्थेत असलेल्या वृक्ष कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असते.अशा घटना घडू नये यासाठी वसई विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने कंबर कसली आहे.

पालिकेच्या नऊ ही प्रभागात धोकादायक व अतिधोकादायक स्थितीत असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात सुकलेली व धोकादायक असलेली १८१ वृक्ष आढळून आली असून पावसाळ्यापूर्वी त्यांची छाटणी करवून घेतली जाणार असल्याचे वृक्षप्राधिकरण विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितले आहे. रस्त्याच्या कडेला, नागरी वस्तीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी जर झाडे धोकादायक अवस्थेत असतील तर त्याची माहिती वृक्षप्राधिकरण विभागाला देण्यात यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.

पालिकेच्या कार्यक्षेत्रात जी धोकादायक वृक्ष आहेत त्यांची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या आधीच हे कामे मार्गी लागतील.- समीर भूमकर, उपायुक्त महापालिका

आतापर्यंत ६४२ झाडांची फांद्या छाटणी

वसई विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे  झाडे कोसळण्याच्या घटना  समोर येत असतात. यामुळे घरावर, गाडीवर वृक्ष कोसळून विविध प्रकारचे नुकसान होत असते.  असे प्रकार घडू नये यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे, धोकादायक असलेली वृक्ष बाजूला करणे अशी विविध प्रकारची कामे पार पाडण्यास सुरवात केली आहे. रस्त्याच्या कडेला, रहदारी असलेल्या मार्गात, सार्वजनिक ठिकाणे अशा सर्व ठिकाणांची पाहणी करून वृक्षांच्या अस्ताव्यस्त अवस्थेत वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केली आहे. यासाठी नऊ प्रभागात ३ ठेकेदार नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत छाटणी करवून घेतली जात आहे आतापर्यंत ६४२ झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली आहे.

अवकाळीमुळे ४० ठिकाणी वृक्षांची पडझड 

अवकाळी पावसासह शहरात वादळी वारे ही घोंगावत होते. या वसई विरार मध्ये  झाडे कोसळण्याच्या घटना समोर आल्या होत्या. यात विरार रानपाडा, नायगाव कोळीवाडा, तामतलाव वसई,आनंद नगर गिरीविहार सोसायटी , चंद्रपाडा, यासह अन्य ठिकाणी एकूण ४० झाडे कोसळली असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.  या घडलेल्या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून चाळी, घरे, यांचे पत्रे फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी ही झाडे विद्युत पोल वर पडल्याने बहुतेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.