Ganesh Naik Vs Pratap Sarnaik/ वसई: मागील काही दिवसांपासून वसई-विरार, मिरा भाईंदर शहरात दहिसर पथकर नाका स्थलांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांनी पथकर नाका स्थलांतराचे दिलेले आश्वासन आणि भाजप पक्षाच्या नेत्यांनी त्याला दर्शवलेला विरोध यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा अधिकच तापला आहे. तर शुक्रवारी विरार येथील जनता दरबारात “जुनी जकात नाक्याची जागा सुपीक डोक्याच्या माणसांनी विकासकांच्या घशात घातली आहे. त्यामुळे येथे समस्या निर्माण झाली, असा अप्रत्यक्ष निशाणा भाजप नेते गणेश नाईक यांनी शिंदेसेनेवर साधल्यामुळे दहिसर पथकर नाक्यावरून सुरु असलेला वाद अधिकच विकोपाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून दहिसर पथकर नाक्यामुळे महायुतीत सतत खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर पथकर नाक्यामुळे मिरा-भाईंदर तसेच ठाण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गंभीर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. तर प्रवाशांची ही समस्या दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पथकर नाका लवकरच स्थलांतरित केला जाईल अशी घोषणा केली होती. तर त्यानंतर वसईच्या हद्दीतील वर्सोवा येथे हा पथकर नाका स्थलांतरित केला जाईल अशा चर्चांना उधाण आले होते.
पण, नवी मुंबईतील जनता दरबारात दहिसर पथकर नाका वर्सोव्याला स्थलांतरित केला जाणार नाही. ही जागा वनविभागाची असल्यामुळे त्याला परवानगी मिळणार नाही अशी भूमिका गणेश नाईक यांनी घेतली होती. तर त्यानंतरही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर पथकर नाका स्थलांतरीत करण्याचे आश्वासन पूर्ण करणार, असल्याचे म्हणत, वसईतील ससूनवघर येथे पाहणी दौरा केला. मात्र काँग्रेस पक्ष, भूमिपुत्र संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना आल्या पावली माघारी परतावे लागले. तर त्यानंतर मूळ स्थानापासून ५० मीटर पुढे पथकर नाका स्थलांतरित करून शिवसेनकडून याचा जल्लोष साजरा करण्यात आला होता.
पण, विरारमधील जनता दरबारात पथकर नाक्याच्या प्रश्नावरून गणेश नाईक शिंदे सेनेवर पुन्हा एकदा ताशेरे ओढताना दिसले. यावेळी जकात नाक्याच्या जागेचा उल्लेख करत त्यांनी म्हंटले कि, दहिसर पथकर नाक्याजवळ सुरुवातीला जकात नाका होता. त्याच जागेत पथकर नाक्याचा विस्तार झाला असता तर वाहतूक कोंडी सुटली असती. पण, कोणत्यातरी सुपीक डोक्याच्या माणसाने ती जागा विकासकांच्या घशात घातली आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
आधीच गैरसोय त्यात आणखीन भर नको..
माझी प्रताप सरनाईकांशी भेट झाली आहे. मी त्यांना म्हटलं की आपण यावर बोलू. आणि त्यांना पथकर नाका खरोखरच सरकवायची इच्छा असेल तर घोडबंदर रोडच्या अलीकडे नॅशनल पार्कचा भाग आहे. त्यामुळे तिथे रस्ते रुंदीकरणासाठी जागा मिळत नाही. तर पथकर नाक्यासाठी जागा कुठून मिळणार. गैरसोय ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी पथकर नाका होणार नाही. पथकर नाका सरकवण्याला आमचा विरोध नाही. पण त्यांनी जर पटवून दिले तर आम्ही त्यांना उलट पाठिंबा देऊ. आधीच गैरसोय असताना त्यात अजून गैरसोय करणे योग्य ठरणार नाही असेही गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
पथकर नाक्यामुळे सेना भाजप आमने- सामने
ठाणे, डोंबिवली आणि पालघरनंतर आता वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरातही महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. तर दहिसर पथकर नाक्यामुळे या वादाची धार अधिकच तीव्र झाली आहे. विरार येथील जनता दरबारा, “मी पालघर जिल्ह्याचा पालक मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचा संपर्कमंत्री आहे. एकेकाळी पेणकरपाडा, काशिमिरा, उत्तन, डोंगरी हा माझ्या मतदारसंघाचा भाग होता. तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाठीमागे टोल नाका आणणे ही गोष्ट लोकांच्या सोयीची होणार नाही. तर पालघर जिल्ह्यात स्वप्नातही पथकर नाका होणार नाही, अशी भूमिका घेत गणेश नाईकांनी शिंदेगटाची कोंडी केल्यामुळे येत्या काळात हा वाद चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
