वसई: वसई, विरारमध्ये काही ठिकाणी सुरू असलेले आरएमसी प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात आता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मालजीपाडा येथील मेसर्स एन. जी. प्रकल्प बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तर इतर सहा प्रकल्पांना प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे आरएमसी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करतात. मात्र हे प्रकल्पमालक पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळत नाहीत. प्रदूषण रोखण्याची यंत्रणा नसल्याने कारखान्यांतून सतत धुळीचे प्रदूषण होते. ही सर्व धूळ थेट महामार्गावर येते. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरी आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. अखेर मंडळातर्फे कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा : वसई : शहरातील पोलीस ठाण्यांचे बळ वाढणार, पोलीस भरतीतून आलेले ९९६ पोलीस लवकरच रुजू होणार

नुकताच मालजीपाडा येथील मेसर्स एन. जी. प्रोजेक्टस हा कारखाना प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून चालविला जात असल्याचे प्रदूषण मंडळाच्या निदर्शनास आले आहे. हा कारखाना सीलबंद करावा यासाठी मंडळाने वसई-विरार महापालिकेला कारवाईच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय ज्या कारखान्यात उत्पादन करीत असताना प्रदूषण रोखण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या जात नाहीत अशा प्रकल्पांना नोटिसा बजावण्याचे काम सुरूच आहे. आतापर्यंत सहा प्रकल्पांना उपाययोजना करण्याच्या संदर्भात नोटिसा दिल्या आहेत तर दोन प्रकल्पांच्या नोटिसा प्रस्तावित आहेत, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : विरारच्या विवा महाविद्यालयातील घटना; ५ व्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

नैसर्गिक सौंदर्य धोक्यात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई, विरारमधून जातो. या महामार्गा लगतचा हिरवागार परिसर आहे. मात्र या प्रकल्पातून सतत उडणाऱ्या धुळीने येथील निसर्गरम्य परिसराची धूळधाण होऊ लागली आहे. अनेक हिरवी झाडेही धुळीने भरली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रदूषण पसरविणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई सुरू आहे. नुकताच एक प्रकल्प बंद करण्यासाठी पालिकेला पत्र दिले आहे. याशिवाय प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजनेसाठी सहा प्रकल्पांना नोटिसा बजावल्या आहेत.” -आनंद काठोळे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळ, ठाणे- पालघर