वसई: वसई विरार शहरात धोकादायक इमारतींचा मुद्दा ताजा असताना शुक्रवारी सायंकाळी वसई पश्चिमेतील कृष्णा टाऊनशिप परिसरातील गटारावरील अनेक वर्षे जुना स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरात सातत्याने स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे धोकादायक स्लॅबचा मुद्दा चर्चेत आला आहे.
वसई पश्चिम भागात कृष्णा टाऊनशिप परिसर आहे. या भागातून महापालिकेचे गटार गेले आहे. दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेकडून या गटारावर स्लॅब टाकण्यात आला होता. त्यानंतर या स्लॅबवर लहान मुलांसाठी खेळणी, बसण्यासाठी बाक बसवून छोटसे उद्यान तयार करण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे. या भर पावसातच शुक्रवारी संध्याकाळी या स्लॅबचा मधला भाग कोसळला आणि त्यावरची खेळणीही नाल्यात पडली. सुदैवाने, त्यावेळी या परिसरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. स्लॅबच्या लोखंडी सळ्या गंजल्यामुळे नाल्यावरील स्लॅब कमकुवत झाला होता.
शहरात स्लॅब कोसळण्याची ही काही पहिली घटना नाही. गेल्या महिन्याभरात शहरात दुसऱ्यांदा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यापूर्वी वसई पश्चिमेतील तहसील कार्यालयानजीक असणाऱ्या गटारावरील स्लॅब कोसळला होता. तसेच शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्याकडेला असणारे स्लॅब देखील खचलेल्या, तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. पण वारंवार तक्रार करूनही या महापालिकेकडून मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धोकादायक स्लॅबच्या लेखापरीक्षणाची मागणी
वसई शहरात गेल्या महिन्याभरात दोन स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर शहरातील विवीध ठिकाणचे स्लॅब देखील जीर्ण अवस्थेत दिसून येत आहेत. सातत्याने स्लॅब कोसळण्याच्या घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्यामुळे महापालिकेकडून अशा धोकादायक स्लॅबचे लेखापरीक्षण करून ते दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.