वसई : वसईच्या चुळणे गावातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींची माणिकपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. तुंगारेश्वर जंगलात त्या बुधवारी रात्री आढळून आल्या. या मुलींना फूस लावून पळवून नेणार्‍या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी या मुलींच्या वडिलांच्या तबेल्यात काम करणारा कामगार आहे.

वसईच्या चुळणे गावात राहणार्‍या १५ आणि १३ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी मंगळवारी पहाटेपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या घरात काम करणारी १५ वर्षीय मदतनीसही बेपत्ता होती. या मुलींच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथके तयार केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला असता मुली नालासोपारा स्थानकात उतरून रिक्षाने तुंगारेश्वरच्या जंगलात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन मुले होती. बुधवारी रात्री पोलिसांनी तुंगारेश्वर जंगल पिंजून काढले आणि एका झोपडीतून या दोन मुलींची सुखरूप सुटका केली.

हेही वाचा : वसईतील ३ अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरण, बोरीवली स्थानकात दोन मुलांसह सीसीटीव्हीत दिसल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलींच्या वडिलांचा तबेला असून त्यात काम करणार्‍या दोन मुलांनी या बहिणींना फूस लावून नेले होते. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे तर दुसरा १९ वर्षांचा आहे. त्याला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मुली सुरक्षित असून त्यांच्याबरोबर कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले. मुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना आरोपींनी पळवून नेले होते असे पोलिसांनी सांगितले.