वसई: दहीहंडी उत्सव एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.. त्यामुळे वसई विरार शहरात ‘बोल बजरंग बली की जय’ अशा उत्साही वातावरणात गोविंदा पथकांचा कसून सराव सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सराव करताना गोविंदा पथकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
वसई विरार मध्ये अनेक ठिकाणी मोठं मोठ्या दहीहंड्या लावल्या जातात. या हंड्या फोडण्यासाठी व मनोरे रचून सलामीसाठी शहरातील गोविंदा पथकांची चांगलीच कसरत सुरू असते. विशेषतः उंचावरील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चढाओढ लागते. वसई विरार मध्ये ८० हून अधिक गोविंदा पथके आहेत.
यंदाच्या वर्षी बहुतांश गोविंदा पथकांचा गुरुपौर्णिमेपासून मोकळ्या मैदानात सराव सुरू झाला आहे. येत्या १६ ऑगस्ट गोपाळकाला साजरा केला जाणार असून, त्याच्या तयारीसाठी महिनाभर आधीच सरावास प्रारंभ करण्यात आला आहे. मनोऱ्यांचे थर व्यवस्थेत व सुरक्षित कसे लावता येतील याकडे आता गोविंदा पथकांचा कल आहे.त्यानुसार दररोज संध्याकाळच्या सुमारास अडीच ते तीन तास तरुण मंडळी एकत्रित जमून मनोरे रचण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय काही पथके एकावर एक चार एक्के लावण्यासाठी प्रयत्न करू लागले आहे. पाच ते सहा थर व त्याही पेक्षा अधिक थरांची सलामी कशी देता यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे गोविंदा पथकांनी सांगितले आहे. एकावर एक मनोरे रचणे हा साहसी खेळ आहे. त्यामुळे सरावाच्या दरम्यान ही प्रत्येक गोष्ट बारकाईने पहावी लागत आहे. तसेच सर्वात उंच थरावर चढणाऱ्या सलामीवीराला जॅकेट आणि हेल्मेट देऊन त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यापासून आम्ही अधिक जोमाने आणि उत्साहाने सराव करत आहोत असे सराव करणाऱ्या गोविंदानी सांगितले आहे.
“५ जुलैपासून आम्ही दहीहंडीच्या सरावाला सुरुवात केली आहे. दररोज दोन ते अडीच तास सराव केला जातो. सरावासाठी ३० ते ४० गोविंदा नियमितपणे उपस्थित राहतात. आमचं पथक सात थरांची सराव करत आहोत. – राहुल कडवेकर, साई मित्रमंडळ गोविंदा पथक
गोविंदांसाठी महापालिकेची विमा योजना
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही वसई-विरार महापालिकेकडून गोविंदांसाठी विमा संरक्षण दिलं जाणार आहे. प्रत्येकी ७५ रुपयांच्या दराने सुमारे ६,००० गोविंदांचा विमा काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मागील वर्षी महापालिकेने ११० गोविंदा पथकांतील सदस्यांचा विमा उतरवला होता. यंदाही तोच पायंडा कायम ठेवत ओरिएंटल कंपनीमार्फत विमा उतरवला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.