वसई: टँकरने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी विरार येथे ही घटना घडली. संजना संदीप राणे (३४) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे.
संजना राणे ही विरार पूर्वेच्या कोपरी चंदनसार नित्यानंद नगर येथे राहते. बुधवारी सकाळी मुलीचे शैक्षणिक प्रगतीपत्रक आणण्यासाठी शाळेत जाण्यासाठी अजित पारकर यांच्या सोबत मुलीला घेऊन दुचाकीवरून निघाली होती.
मात्र विरार पूर्वेच्या बजरंग प्लाझा सोळंकी शाळेच्या समोर भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने (एम.एच.४३ यु. ८४३१) दुचाकीला (एम एच ४८ बी.वाय. ३९३२) जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या संजना यांना गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर टँकर चालक वाहन सोडून पळून गेला आहे.
या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी टँकर ताब्यात घेतलेअसून फरार चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा वसई विरार मध्ये टँकरच्या बेदरकारपणामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.