वसई: वसई-विरार शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने आता नागरिकांच्या दारातून प्लास्टिक आणि ईकचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असा कचरा गोळा करून त्याची पुनर्पक्रिया करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कचराभूमीतील कचरा कमी होईल तसचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकतील असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
वसई-विरार शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेची वसई पूर्वेला एकमेव कचराभूमी आहे. तेथे दररोज साडेसातशे मेट्रिक टनाहून अधिक कचरा जमा होत आहे. अद्याप घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. कचऱ्यापासून जैवइंधन तयार करण्याचे प्रकल्प सुरू व्हावेत, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. कुठलाही प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. मात्र कचराभूमीतील कचऱ्यात प्लास्टिक आणि ई-कचरा मोठय़ा प्रमाणावर असल्याने वर्गीकरण होत नाही आणि परिणामी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात अडचणी येत आहेत. यासाठी पालिकेने आता कचराभूमीवर प्लास्टिक आणि ईकचरा कसा कमी करता येईल यावर विचार सुरू केला आहे. पालिकेने यासाठी नागरिकांच्या दारातूनच प्लास्टिक कचरा आणि ईकचरा वेगळा गोळा करण्याबाबत विचार सुरू केला आहे. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हा प्रयोग केला जाणार आहे. अनेक सामाजिक संघटना प्लास्टिक गोळा करून तो पुनप्र्रक्रियेसाठी कंपन्यांमध्ये जमा करतात. त्यासाठी अशा सामाजिक संघटनांबाबत बोलणी सुरू आहेत. वसईतील काही कंपन्या ई-कचऱ्यावर प्रक्रिया करतात. त्यामुळे ई-कचरादेखील वेगळा जमा करून तो या कंपनीत नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
ई-कचरा आणि प्लास्टिक नागरिकांच्या दारातच स्वतंत्रपणे गोळा करण्याचा आमचा विचार आहे. आठवडय़ातून एकदा असा कचरा गोळा करता येऊ शकेल. अर्थात यासाठी नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे कचराभूमीवरील कचरा कमी होईल आणि घनकचरा व्यवस्थापन करणे सोपे जाईल.-चारूशिला पंडित, उपायुक्त (घनकचरा), वसई-विरार महानगरपालिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent recycling plastics ewaste unique municipal experiment waste problem amy
First published on: 16-04-2022 at 00:27 IST