दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका
शहरातील करोना परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांचा राज्यपालांनी नुकताच सत्कार केला. करोना नियंत्रण, रुग्णालयांची सुरक्षितता आणि लसीकरणाची मोहीम यांबाबत नगरविकास खात्याने ‘मीरा भाईंदर पॅटर्न’चे कौतुक करून इतर महापालिकांना हा पॅटर्न राबविण्याचा सल्ला दिला. याशिवाय लसीकरणात मीरा-भाईंदर शहर मुंबई महानगर क्षेत्रात अव्वल ठरले आहे. याबाबत आयुक्त दिलीप ढोले यांच्याशी केलेली बातचीत..
शहरातील करोना स्थिती नेमकी कशी हाताळली?
करोनाच्या लाटेतच पदभार स्वीकारला होता. करोना आटोक्यात आणणे हे आव्हान होते. यासाठी शहरात आठ करोना उपचार केंद्रे उभारली. रुग्णांना औषधांचा साठा तसेच प्राणवायू कमी पडू नये यासाठी विशेष लक्ष पुरवले.
रुग्णसंख्या कशी आटोक्यात आणली?
आम्ही चाचण्यांवर भर दिला होता. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच रुग्ण शोधून त्यांना उपचार देता आले. प्रतिबंधात्मक क्षेत्रे वाढवून संसर्ग रोखला. आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढवून रुग्णांना चांगले उपचार दिले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत अन्यत्र हाहाकार उडाला असताना मीरा-भाईंदर शहरातील परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या नियंत्रणात राहिली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी क्षमतेच्या तीन पट प्राणवायू निर्मितीची व्यवस्था करून ठेवली आहे.
रुग्णालयातील दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाय केले?
राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना होऊन निष्पाप नागरिकांचे प्राण जात होते. यासाठी आम्ही आमच्या आठ करोना केंद्रांबाहेर अग्निशमन वाहन सज्ज ठेवले होते. हे वाहन २४ तास रुग्णालयाबाहेर असायचे. चुकून अनर्थ घडला तर क्षणाचाही विलंब न होता आग आटोक्यात आणता येईल हा हेतू यामागे होता.
रुग्णालयांना तिहेरी सुरक्षा कवच कसे दिले?
– आग लागलीच तर तात्काळ उपाय करता यावा यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज ठेवलीच होती. परंतु आग लागूच नये यासाठी सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेला महत्त्व दिले. रुग्णालयांची इमारत सुरक्षित आहे का यासाठी इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेतले. याशिवाय रुग्णालयांची विद्युत यंत्रणा सदोष आहे का हे तपासण्यासाठी विद्युत लेखापरीक्षणही करून घेतले. याशिवाय सखोल अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करून घेतले. शहरात १४८ खासगी रुग्णालये आहेत. त्या सर्वाचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. अशा प्रकारे तिहेरी सुरक्षा कवच प्रदान करणारी मीरा-भाईंदर ही एकमेव महापालिका ठरली आहे. रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रुग्णालयांची गोपनीय तपासणी केली होती. त्यात रुग्णालयांची स्थिती, सुरक्षेच्या उपापयोजना चांगल्या असल्याचे आढळून आले. यामुळे मानांकनात ५२ गुण देण्यात आले. अशा प्रकारे राज्यात सर्वाधिक गुण हे मीरा-भाईंदर महापालिकेला मिळाले.
लसीकरणात कशी आघाडी घेतली?
करोनाची दुसरी लाट नियंत्रणात ठेवण्यात यश आले होते. पण ती रोखण्यासाठी करोनाप्रतिबंधक लशी हा उपाय होता. या लशी सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी विशेष मोहिमा हाती घेण्यात आल्या. शासनाकडून सतत पाठपुरावा करून लशींचा साठा मागवून घेतला. शहराची लोकसंख्या १२ लाख आहे. आतापर्यंत ९५ टक्के लोकांना लशींच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत.
सर्वांपर्यंत लस कशी पोहोचवली?
दिवाळीच्या दिवसांतही आम्ही लसीकरण सुरू ठेवले. कामावार जाणाऱ्या लोकांना सोयीचे व्हावे यासाठी आठवडय़ातील दोन दिवस तीन केंद्रे २४ तास लसीकरणासाठी खुली ठेवली आहेत. शहरात दररोज ५० लसीकरण केंद्रांतून लशी देण्यात आल्या. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांत सर्वाधिक लसीकरण करण्यात आम्हाला यश आले.
सर्वेक्षणाचा काय उपयोग झाला?
लसीकरणापासून कुणी वंचित राहू नये यासाठी आम्ही नागरिकांच्या दारात जाऊन सर्वेक्षण केले. त्यासाठी ४५० कर्मचारी नियुक्त केले होते. या सर्वेक्षणातून लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर केले. शिवाय ज्यांना लस घेण्यात अडचणी होत्या त्या दूर करून त्यांचे लसीकरण केले.
– मुलाखत : सुहास बिऱ्हाडे