वसई: वसईच्या राजोडी गावातील वृध्दाचा पर्यटकाच्या दिलेल्या मोटारसायकलीने झालेल्या मृत्यूमुळे  हुल्लडबाज प्रवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील दोन महिन्यातील हा ६ वा अपघात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. किनारपट्टीवरील रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या हुल्लडबाजीला आवर घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. वसई पश्चिमेतील परिसरात विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. तसेच आजू बाजूचा परिसर हा निसर्गरम्य असल्याने वसई विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव आदी समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. तर किनार पट्टीच्या भागात

दोनशेहून अधिक लहान मोठी रिसॉर्टस आहेत. अर्नाळा, नवापूर, राजोडी, कळबं अशा परिसरात त्यांचा विस्तार झालाय. बहुतांश रिसॉर्ट ही बेकायदेशीर असून नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेली आहेत. समोर समुद्र, निसर्गरम्य वाडी, तरणतलाव, करमणुकीची साधने अशा या रिसॉर्टचं स्वरूप असल्याने  सुट्टीच्या दिवशी मौज मज्जा करण्यासाठी या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. 

मात्र काही पर्यटकांमार्फत मद्यपान करून हुल्लडबाजी केली जात आहे याच हुल्लडबाजीचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नुकताच राजोडी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या ८६ वर्षीय वृद्धाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर येथील नागरिक आक्रमक झाले असून या हुल्लडबाजीला आवर घालावा अशी मागणी पुढे येत आहे.

पर्यटकांमुळे गावातील सर्व रस्ते शनिवार रविवार अक्षर: ब्लॉक होतात. राजाेडी समुद्रकिनारा ते सत्पाळा नाका पर्यंत प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी हाेत असते. रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही इतकी भयाण अवस्था असते, असे राजोडी गावातील डॅनिस रॉड्रीक्स याने सांगितले. वाहतूक कोंडी, पर्यटकांची हुल्लडबाजी प्रचंड तापदायक ठरत आहे. इथे येणारे हे पर्यटक मद्यपान करून येतात, मद्याच्या बाटल्या फेकतात, महिलांची छेडछाड करत असतात. त्यांच्या हुल्लडबाजीमुळे ग्रामस्थांशी वाद होत असतात असे नंदाखाल येथील जॉन परेरा यांनी सांगितले.  पर्यटकांच्या उन्मादाविरोधात ग्रामस्थ सतत शासनदरबारी तक्रारी पाठपुरावा केला जातो. मात्र कारवाई होत नाही. मागील वर्षी विरारच्या दोन तलाव येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून पर्यटकांच्या गाड्या अडविल्या होत्या. परंतु परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

सुट्टीचा निवांत पणा हरवला

 रविवार हा सुट्टीचा, आरामाचा, निवांतपणे कुटुंबियांसमेवत घालविण्याचा..आठवड्याची दगदग, थकवा क्षीण घालविण्याचा हक्काचा दिवस. मात्र वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांचा हा निवांतपणा गेल्या काही वर्षापासून हरवला आहे. कारण ठरलंय ते येथील किनारपट्टीवर असलेले अमर्याद बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्यात हुल्लडबाजी करत येणारे पर्यटक. या रिसॉर्ट मध्ये जाणारे रस्ते गावागावाच्या गल्लीतून जातात. त्यामुळे पर्यटकांची हुल्लडबाजी, निमुळत्या रस्त्यांमुळे गावात होणारी वाहतूक कोंडी यामुळे वसईकर अक्षरश: त्रस्त झाले आहे. रविवारी तर घरातून बाहेर पडणं देखील कठीण झालंय. अपघाताच्या भीतीने ज्येष्ठांचे संध्याकाळचे फिरणेही बंद केलं असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

किनार पट्टीवर व  रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी पर्यटक रेल्वे स्थानकातून रिक्षा ,टमटम (सहा आसनी रिक्षा) किंवा खाजगी वाहनातून येतात. ते आब्राहम नाका, उंबरगोठण ते नवापूर, नंदाखाल, वटार, दोन तलाव आदी मुख्य रस्ता सोडून असलेल्या मधल्या गावांमधून जात असतात. पर्यटकांच्या वाहनांमुळे गावातील निमुळत्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडता येत नाही

त्यामुळे किनारपट्टीवरील रिसॉर्टला जाण्यासाठी पर्यायी रस्ते तयार करावे, असे उंबरगोठण येथील रहिवाशी विशाल राऊत यांनी सांगितले.

वसईत बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी सर्वेक्षण करून नोटिसा बजावल्या आहेत. –डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुद्र किनारे व रिसॉर्ट असल्याने सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते. यावेळी सातत्याने पोलिसांच्या पथकाकडून गस्त घातली जाते. जे पर्यटक हुल्लडबाजी करताना आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.-विजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्नाळा सागरी पोलीस ठाणे.