झोपडय़ांच्या अतिक्रमणाची गृहनिर्माणमंत्र्यांकडून पाठराखण? ; पालिकेच्या कारवाईला विरोध

मीरा रोड येथे राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची या रहिवाशांनी भेट घेतली.

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरक्षित जमिनीवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण दूर करण्याच्या  प्रशासनाच्या कारवाईला खुद राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेच्या नावे सातबारा झालेल्या काशिमीरा येथील आरक्षण क्रमांक ३६४  जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण मोकळे करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार सुमारे तीनशेहून अधिक झोपडपट्टीवर तीन महिन्यांपूर्वी पालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाईदेखील केली होती, मात्र ही कारवाई बेकायदा असून पालिका प्रशासन विकासकाच्या हितासाठी हे काम करत असल्याची तक्रार झोपडपट्टीधारकांनी केली आहे. शिवाय पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत ही जागा सोडण्यास नकार दिल्याने वाद सुरू आहे.

अशा परिस्थितीत बुधवारी मीरा रोड येथे राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची या रहिवाशांनी भेट घेतली. आव्हाडांनी नागरिकांची समस्या ऐकून घेतल्यानंतर थेट प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांना फोन लावून यासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली.

यावेळी पालिकेने नियमाचे उल्लंघन करत झोपडपट्टीधारकांवर कारवाई केल्याचे आरोप आव्हाडांनी प्रभाग अधिकाऱ्यावर लावले व कोणत्याही गरीब झोपडपट्टीधारकांना नवीन घराची चावी दिल्याशिवाय हलवण्याचा प्रयत्न केल्यास आपण स्वत: विरोध करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.   हे सर्व संभाषण समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात वायरल झाल्यामुळे  सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागले आहे. तर खुद्द गृहनिर्माणमंत्री झोपडपट्टीधारकांच्या पाठीशी उभे राहत असल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न पालिकेतील अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad opposed mbmc action to remove the encroachment of slums zws

Next Story
ई-सुविधांमध्ये मीरा-भाईंदर राज्यात अव्वल!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी