वसई : कामण बापाणे रस्त्याचे काम मंजूर झाले परंतु रस्त्याचे कामच सुरू होण्याऐवजी येथे अतिक्रमणे मात्र फोफावू लागली होती. ‘लोकसत्ता’ने याविषयीचे वृत्त प्रसारित करताच आता पालिकेने ही अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच या रस्त्याच्या कामाची निविदा काढून या रस्त्याचे काम मार्गी लावले जाणार आहे.
वसई पूर्वेतील कामण बापाणे भागातून राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाला जोडणारा कामण ते बापाणे असा रस्ता तयार करण्यात येणार होता. हा रस्ता झाल्यास कामण ते बापाणे हे अंतर सुमारे सात किमीने कमी होईल. कामण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तसेच कोल्ही चिंचोटी येथे सतत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कामण बापाणे रस्ता उपयुक्त ठरणार आहे. पालिकेने १ हजार ९१८ मीटर लांबीचा कामण-बापाणे रस्ता मंजूर केला होता. त्यासाठी १० कोटी ३९ लाखांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यताही मिळाली आहे. मात्र तीन वर्षे उलटली तरी कामाला सुरुवात नाही. दुसरीकडे भूमाफियांनी संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. ही बांधकामे हटवून रस्त्याचे काम मार्गी लावावे, या मागणीसाठी, कामण बापाणे रस्ता संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु पालिकेने आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत रस्त्याच्या मध्ये असलेले अनधिकृत बांधकाम हटवून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन पालिकेच्या ‘जी’ प्रभाग प्रभारी सहायक आयुक्त नीलम निजाई यांनी दिले आहे.
पालिकेच्या आश्वासनामुळे १२ एप्रिल होणारे आंदोलन हे स्थगित केले आहे. परंतु वेळेत तोडगा न निघाल्यास रस्ता संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जागा हस्तांतरण प्रक्रिया प्रगतिपथावर
कामण बापाणे रस्त्याच्या एकूण १ हजार ९९८ मी. लांबीपैकी ६०८ मी. रस्ता वन खात्याच्या अखत्यारीत आहे. वन खात्याची परवानगी व जागा हस्तांतरण करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात सन २०२१-२२ ची राज्य दर सूची लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रस्तावास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तसेच सदर रस्त्यात बाधित होणारी अनधिकृत बांधकामे निष्कासित करून सदरचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे जी प्रभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त नीलम निजाई यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaman bapane road obstacles removed municipality unauthorized construction national highways state route amy
First published on: 13-04-2022 at 01:11 IST