वसई – नालोसापाऱ्यात राहणाऱ्या रोहन तिवारी या २२ वर्षांच्या तरुणाच्या कुटुंबियांना रात्री एक व्हिडिओ पाठविण्यात आला. रोहन चे अपहरण करण्यात आले होते आणि त्याला मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले होते. रोहनच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी ३ लाखांची खंडणी मागितली होती. आचोळे आणि मुंबईतील शिवाजी नगर पोलिसांनी एक शोधमोहीम राबवली. ११ तासांच्या अथक तपासानांतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला. पण जे समोर आलं ते धक्कादायक होतं…

रोहन तिवारी हा २२ वर्षांचा तरुण. नालासोपार्‍यात आई, दोन लहान भाऊ, काकांचे आदींच्या संयुक्त कुटुंबात राहणारा तरूण. सारं काही आलबेल सुरू होतं. रात्री अचानक त्याच्या काकांच्या मोबाईलवर एक व्हिडियो आला. हा व्हिडियो खुद्द रोहनच्या मोबाईलवरून आला होता. एका अज्ञातस्थळी रोहनला बांधून ठेवले होते आणि त्याला मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत तो रक्तबंबाळ झाला होता. व्हिडियो मध्ये अपहरणकर्त्यांनी ३ लाखांची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास रोहनला ठार मारण्यात येईल असे सांगण्यात आले. त्याचे कुटुंबिय लगेच आचोळे पोलीस ठाण्यात पोहोचले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने घटनेचे गांभिर्य ओळखून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

मध्यरात्रीची शोध मोहीम

पोलिसांनी रोहनच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता ते चेंबूरच्या म्हाडा कॉलनी परिसरातील होते. हा संपूर्ण भाग दाट झोपडपट्टी परिसराचा होता. आचोळे  पोलिसांनी स्थानिक शिवाजी नगर पोलीस ठाण्याची मदत घेतली. अपहरणकर्त्याने फोन बंद केला होता. त्यामुळे अडचणी होत्या. पुन्हा अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि वेळ कमी असल्याचे सांगितले. पोलिसांनी मग आपला डाव टाकला. त्यांनी अपहरणकर्त्याल बोलण्यात गुंतवून ठेवलं.

आता बॅंक बंद असल्याने पैसे काढता येणार नाही असे सांगून तात्पुरते ५ हजार रुपये पाठवले. अपहरणकर्त्यांचा नाईलाज झाला. सकाळी ९ वाजता बॅंक उघडेल आणि पैसे काढू असं सांगून वेळ मारून नेली. दरम्यान पोलिसांचे पथक रात्र भर विविध ठिकाणी छापे घालत होते. पण काही हाती लागत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली होती. अपहरणकर्त्यांनी रोहनच्या मोबाईल मधूनच त्याचा व्हिडीओ पाठवला होता, तसेच त्याच्याच खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले होते. खंडणीचे ३ लाख रुपये त्यांना तत्काळ हवे होते. या सर्व बाबी संशयास्पद वाटत होत्या होत्या.

सकाळी ११ च्या सुमारास अपहरणकर्ते रोहनला घेऊन अपहरणकर्ते एका ठिकाणी नाष्टा करण्यासाठी आले. त्यांच्या पाळतीवर असणार्‍या रोहनच्या काकांनी पोलिसांना खूण केली आणि पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या..

स्वत:च्या अपहरणाचा बनाव..

मात्र जे समोर आलं ते धक्कादायक होतं. रोहन आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून हा अपहरणाचा डाव रचला होता. याबाबत बोलताना आचोळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी यांनी सांगितले की, रोहन तिवारी याला मित्रांसमेवत प्रिटींगचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी भांडवल हवे होते. जर घरी मागितले असते तर पैसे मिळाले नसते. म्हणून त्याने मित्रांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला.

याप्रकऱणी आचोळे पोलीस ठाण्यात रोहन आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे आणि निखिल सिंग यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आचोळे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल शर्मा तसेच अमोल सांगळे, अमोल बर्डे, विनायक कचरे आदींच्या पथकाने ११ तासांच्या या थरारक अपहरण नाट्याचा उलगडा केला.