वसई:- वसई पूर्वेच्या गोखीवरे फादर वाडी येथील एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर पालिकेच्या अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. वसई पूर्वेच्या गोखीवरे फादरवाडी परिसर आहे. या भागात रस्त्याच्या लगत पत्र्याच्या शेड मध्ये जुने एसी, फ्रीज व इतर भंगार साहित्य असलेले गोदाम आहे.
गुरुवारी दुपारी अचानकपणे या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे या परिसरात खळबळ उडाली होती. आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ उंचच उंच हवेत उसळत होते.
या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले होते. अवघ्या एक ते दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून गोदामातील भंगार व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.नेहमी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.