वसई /भाईंदर : मिरा भाईंदर – वसई विरार शहरात अमली पदार्थ खरेदी- विक्रीचा मोठा सुळसुळाट पसरू लागला आहे. मागील सहा महिन्यात पोलिसांनी एकूण ८०३ गुन्हे दाखल करून जवळपास ५४ कोटींचा साठा जप्त केला आहे. यामध्ये अमली पदार्थाचे सेवन तसेच विक्री प्रकरणात २१८ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर व वसई विरार शहरात गेल्या काही महिन्यापासून तरुण पिढी ही अमली पदार्थाच्या सेवनामुळे वाया जात असल्याची तक्रार येत आहे. प्रामुख्याने हे तरुण शहरातील कमी रहदारी असलेल्या ठिकाणी एकत्र येऊन या पदार्थाचे सेवन करत असतात.यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असते. प्रामुख्याने पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच ‘ से-नो- टू ड्रग्स’ ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.यासाठी नागरी सवांद सुरु करण्यात आला असून शाळा, महाविद्यालयात याबाबतच्या जनजागृतीवर अधिक भर दिला जात.यामध्ये पोलिसांनी आधुनिक उपक्रम देखील राबवले आहेत.तसेच अमली पदार्थाचे सेवन व विक्रेत्यांवर पोलिसांनी छापा टाकून ठोस कारवाई देखील केली आहे.मात्र मागील वर्षभरापासून पोलिसाची ही मोहीम थंडावल्याचे जाणवत आहे. म्हणूनच शहरात पुन्हा अमली पदार्थ संबंधित अनेक तक्रारी पुढे येत आहे.
मिरा रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणांनी हैदास घातल्याची तक्रार नुकतीच समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा ही मोहीम सक्त करून प्रमुख विक्रेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थ विरोधी पथकासह मधवर्ती गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून तब्बल ५४ कोटी ९८ लाख २१० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा मागील सहा महिन्यात जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये जवळपास सर्वच अमली पदार्थांचा साठा आहे.
या कारवाईत पोलिसांनी परजिल्ह्यात तसेच पर राज्यात जाऊन तेथे उभारण्यात आलेले कारखानेच उद्धवस्थ केले आहेत.यात अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ७०४ जणांवर केस नोंदवून ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ८०३ विक्रेत्यांवर छापा टाकून २१९ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी कारवाई करताना परराज्यात छापे टाकून अमली पदार्थ निर्मिती करण्याचे कारखाने देखील उध्वस्त केले. जप्त केलेल्या साठ्यामध्ये एमडी, चरस, कोडीन पावडर यासारख्या महागड्या अमली पदार्थांचाही सामावेश आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गांजाचे ४६ तर एमडीचे ३६ प्रकरणे आहेत. याशिवाय चरस, कोकनचे प्रत्येकी ३ गुन्हाचा समावेश असून यात १६४ जणांना अटक करण्यात आली आहे.
नायजेरियन नागरिकांचा वाढता सहभाग….
वसई विरार व मीरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास आले आहेत.वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.शहरात घडणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कारवाया मध्ये नायजेरियन आणि परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे असल्याचे गुन्ह्यातील तपासादरम्यान दिसून पोलिसांना आले आहे.
अनेक अमली पदार्थांच्या कारवाया मध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात ज्या मोठ्या कारवाया झाल्या त्यात तीनही आरोपी नायजेरियन असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यावर निर्बंध घालण्यात ही पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे.मध्यंतरी त्यांच्या या उपद्रवाला आळा घालण्यासाठी भाड्याने भर देताना आणि बेकायदा वास्तव्य असलेल्या नागरिकांची माहिती घरमालकाने पोलिस ठाण्यात देणे पोलिसांनी बंधनकारक केले होते.मात्र त्यानंतर ही अनेक परदेशी नागरिक विना परवाना शहरात राहत आहेत.त्यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
१ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ दरम्यान अमली पदार्थ संदर्भात पोलिसांनी केलेली कारवाई :-
प्रकार | कारवाई | अटक |
सेवन | ७०४ | ५५ |
विक्री | ८०३ | २१९ |