भाईंदर:- मिरा भाईंदर शहरातील अनेक खासगी रुग्णालये व दवाखाने जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मिरा भाईंदर शहरात दोन शासकीय रुग्णालय,१८ आरोग्य केंद्र,१९५ खासगी रुग्णालय आणि पाचशेहुन अधिक खासगी दवाखाने आहेत.यातून दिवसाला जवळपास पाचशे ते सातशे किलोपर्यंत जैव वैद्यकीय कचरा निघतो.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे.त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील वैद्यकीय संस्थांना चार भागात अशा कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे सूचित केले आहे.यामध्ये पिवळा रंगाच्या पिशवीत शारीरिक व संक्रामक कचरा,लालपिशवीत प्लास्टिक कचरा,निळ्या पिशवीत काच व काचसदृश कचरा आणि पांढऱ्यां पिशवीत सुईसारख्या धारदार वस्तू ठेवण्याच्या सूचना देण्यात आला आहे.
या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालघर येथे स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला असून टच अँड गो संस्थेला हा कचरा गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र शहरात अजूनही बहुतांश रुग्णालय कचऱ्याचे वर्गीकरण करत नसल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात वर्गीकरण न करणाऱ्या रुग्णालयाचा कचरा न उचलण्याचा निर्णय संस्थेमार्फत घेतला जाणार आहे.
महापालिकेकडून कारवाई चा दावा
मिरा भाईंदर शहरातील खाजगी रुग्णालयांना जैववैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. हे वर्गीकरण न करणाऱ्या वर ५ हजार ते २५ हजार रुपया पर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते.आता पर्यंत पंधराहुन अधिक जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील वर्गीकरण न करणाऱ्या रुग्णालयावर कठोर पाऊल उचलणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.