भाईंदर : काशिमीरा येथे  सिमेंट काँक्रीट ची वाहतूक करणाऱ्या डंपरने चिरडल्यामुळे एका शाळेकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन्नी रमेश राठोड(१२)  असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो मीनाक्षी नगर येथील झोपडपट्टी भागाचा रहिवासी  आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी काशिगाव येथील महापालिकेच्या शाळेतून सुटल्यानंतर तो घरी जात होता. यावेळी रस्ता ओलांडत असताना नीलकमळ नाक्यावर त्याला डंपर ने चिरडले होते. यात कमरेखालील  अंगाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला जवळील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते.

सायंकाळपर्यंत प्रकृती सुधार दिसून येत असतानाच अचानक उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून डंपर चालकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.