भाईंदर : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी अस्मितेसाठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट दिली. मात्र सरनाईक येताच आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.पन्नास खोके एकदम ओके, गद्दार तुम्ही परत जा अशा घोषणा देत गोंधळ घातला.मराठी भाषेची सातत्याने गळचेपी होत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी व मराठी एकीकरण समिती व अन्य संघटनांनी मंगळवारी एकत्र येत मिरा भाईंदर शहरात बालाजी हॉटेल ते मिरा रोड रेल्वे स्थानक असा मोर्चा काढण्यात आला होता. यात मोठ्या संख्येने मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते.
मिरा रोड रेल्वे स्थानकाजवळ मोर्चा पोहचताच त्या ठिकाणी समर्थन देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुपारी दीडच्या सुमारास आंदोलन स्थळी भेट दिली. मात्र सरनाईक आंदोलनाच्या ठिकाणी येताच त्यांच्या विरोधात काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तुम्ही गद्दार आहेत. तुम्ही येथून निघून जा अशी घोषणा करण्यात आली त्यामुळे आंदोलन स्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सरनाईकांना ही त्या ठिकाणाहून तातडीने बाजूला नेण्यात आले. मराठी अस्मितेसाठी तसेच माझ्या मिरा भाईंदर मधील मराठी माणसांसाठी मी आंदोलन स्थळी गेलो होतो. मी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निश्चित होते. मात्र बाहेरून आलेल्या काही समाजकंटकांतर्फे शहरातील वातावरण बिघडले. या आंदोलनाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत मिरा भाईंदर चुकीचे राजकारण चालले आहे. येथील वातावरण हे काही लोकांमार्फत खराब करण्यात येत असून त्यात पोलिसही सहभागी झाल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली, मात्र दुसरीकडे मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारण्याची पोलिसांची भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.