भाईंदर :- मिरा रोड येथील नव्या इमारतींच्या बांधकामस्थळी साहित्य थेट रस्त्यावर ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावरील वाहन मार्ग आणि पदपथ अडवल्या जात असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

मिरा रोडच्या परिसरात अनेक नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हा भाग मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असल्यामुळे येथे वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, बांधकाम व्यावसायिकांकडून साहित्य थेट रस्त्यावर ठेवले जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

यापूर्वीच महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना रस्त्यावर साहित्य न ठेवण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले आहे. तरीदेखील शहरातील अनेक भागांमध्ये माती, रेती, सळ्या आणि ब्लॉक्स यांसारखे बांधकाम साहित्य सर्रास रस्त्याच्या कडेला ठेवले जात असल्याचे दिसून येतात.

त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय लोखंडी सळया रस्त्यावरच असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी अशाप्रकारे साहित्य ठेवून वाट अडवणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मिरा रोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रस्त्यावर साहित्य ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.