विरार : वसईच्या सागरशेत येथील पेट्रोलपंपावर भेसळयुक्त पेट्रोल दिले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी वसईच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपाची पाहणी करण्यात आली. प्राथमिक पाहणीत पेट्रोलमध्ये भेसळ केले जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे पुढील तपास होईपर्यंत काही काळासाठी पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे.

वसई पश्चिमेच्या परिसरात सागरशेत पेट्रोलपंप आहे. गेल्या काही दिवसांपासून या पेट्रोलपंपावर पेट्रोलची भेसळ केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या भेसळीमुळे काही वाहनधारकांच्या गाड्या ही बंद पडल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत समाजमाध्यमावर ही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.

वसईच्या पुरवठा कार्यालयाला मिळालेल्या तक्रारीनुसार सोमवारी पुरवठा विभागाकडून पेट्रोलपंपाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक पाहणीत पेट्रोलमध्ये भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे. तसेच यावेळी पेट्रोलचे नमुने गोळा करून ते पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत अशी माहिती वसईचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी दिली. तपासणी होईपर्यंत हा पेट्रोल पंप सील केला असल्याचे त्यांनी सांगितले.