भाईंदर : मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य रस्त्यावरील काशिमीरा ते गोल्डन नेस्ट मार्ग सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) मार्फत केले जाणार आहे.
सध्या मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा फटका वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. विशेषतः रहदारीच्या वेळेत येथे मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते.
या दुरवस्थेमुळे नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींवर टीका केली जात आहे. परिणामी, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, निधीअभावी हे काम प्रत्यक्षात राबवणे कठीण असल्याने, हे काम शासनामार्फत व्हावे, असा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवला आहे.
एमएमआरडीएमार्फत काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मिरा-भाईंदर शहरातील आवश्यक विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख सचिव, मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा, आणि आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.या बैठकीत मेहता यांनी काशिमीरा-गोल्डन नेस्ट मार्गाच्या काँक्रिटीकरणाचा विषय उपस्थित केला. महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने हे काम एमएमआरडीएमार्फत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मेहता यांनी दिली.
काम सुरू होण्यास दिरंगाई
शहराच्या मुख्य मार्गांवर मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. एमएमआरडीएचा मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. उड्डाण पुलाचे काम देखील त्या वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्य रस्त्यावरील रहदारी लक्षात घेता हे काम पूर्ण होईपर्यंत काँक्रिटीकरणाचे काम सुरू करणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काँक्रिटीकरणाचे काम सुरू होण्यास आणखी वेळ लागेल, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.