विरार: विरार पश्चिमेच्या बोळींज येथील जॉय व्हिला गृहसंकुलात एका माकडाने उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात घुसून सामान पळवणे, सदनिकांच्या खिडक्या व बाल्कनीतून आत शिरण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सुरू असल्याने गृहसंकुलातील रहिवासी चांगलेच हैराण झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून विरारमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. याचाच परिणाम म्हणून अन्न आणि पाण्याच्या शोधात जंगली प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये येत आहेत. अशीच एक घटना विरार पश्चिमेकडील जॉय व्हीला गृहसंकुलात घडली आहे. मागील काही दिवसांपासून एक माकड गृहसंकुलाच्या परिसरात आले असून त्यांच्या विविध प्रकारच्या मर्कट लीलानी नागरिक त्रस्त झाले आहेत.
गृहसंकुलातील सदनिकांच्या बालकनी आणि खिडक्यांमधून रहिवाशांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करणे, काहींच्या घरातून खाद्य पळविणे, सदनिकेच्या कोपऱ्यात लपून बसणे, उड्या मारणे असे प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माकड कोणत्याही भागातून येऊन आपल्या घरात घुसेल यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून राहावे लागत आहे. तर ते घरात शिरू नये म्हणून बरेच जण आपल्या घराची दारं खिडक्याही बंद करून बसावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
एकंदरीत गृहसंकुलात मुक्तपणे संचार करणाऱ्या या माकडामुळे नागरिकांना गृहसंकुलाच्या आवारात फिरणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या माकडाला जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरिक करत आहेत.काही महिन्यांपूर्वी वसईतील घनश्याम एन्क्लेव्ह गृहसंकुलात एका माकडाने उच्छाद मांडला होता. त्याच्या मर्कट लीलांनी अक्षरशः नागरिक त्रस्त झाले होते. त्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले होते.
सोसायटीच्या ठिकाणी गेलेल्या माकडाला पकडणे मोठे आव्हानात्मक काम आहे. अनेकदा नागरिक त्याला खाऊ घालतात त्यामुळे तिथेच ते ठाण मांडून राहते. त्या माकडाला जर खाऊ न दिल्यास तो अन्य ठिकाणी जाऊ शकतो असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.