भाईंदर:- महामार्गावरील जाहिरात फलक स्पष्ट दिसावा यासाठी त्याच्या पुढे असलेल्या मोठ्या झाडांना इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नाट्यगृहाजवळ महापालिकेचा एक जाहिरात फलक आहे. हा फलक कंत्राटी पद्धतीने मेसर्स एंगेज आऊटडोअर मीडिया या संस्थेला देण्यात आला आहे. या फलकाच्या थोड्याच अंतरावर २० ते २५ फूट उंचीचे एक आंब्याचे व एक पेल्ट्रोफॉर्मचे जुने झाड आहे. काही दिवसांपूर्वी हे झाड अचानक सुकताना दिसल्याने स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे काही पर्यावरणप्रेमींनी प्रत्यक्ष जाऊन झाडांची पाहणी केली.
झाडांवर तब्बल २९ ठिकाणी भोके आढळून आली. सामान्यतः झाडांना औषध देण्यासाठी अशा प्रकारे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आबाजी सावंत यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यानुसार वृक्ष अधिकारी नागेश विरकर यांनी स्थळाची पाहणी केली असता झाडांना विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेवरून महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला दोन दिवसांत खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, कंत्राटदाराने सदर आरोप फेटाळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
महामार्गावरील झाडांमुळे जाहिरात फलक झाकले जात होते. त्यामुळे हे झाड कंत्राटदारानेच मारण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय महापालिका प्रशासनाला आहे. त्याच अनुषंगाने प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. मात्र, कंत्राटदार ठोस उत्तर देत नसल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.